टीम इंडिया १ जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना झाली. मिनी वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्त्व करत आहे. कोहली त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मैदानातील आक्रमक स्वभावावरून कोहलीला टीकाही सहन कराव्या लागल्या. याच आक्रमक स्वभावावरून कोहलीला प्रशिक्षकांचा मार देखील खावा लागला होता.

कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीच याबद्दलचा खुलासा केला. वरिष्ठ क्रिडा पत्रकार विजय लोकापल्ली यांच्या ‘ड्रिवेन: द विराट कोहली स्टोरी’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते उपस्थित होते. कोहली लहानपणापासूनच खूप हट्टी असल्याचं यावेळी राजकुमार यांनी सांगितले. पण त्याचसोबत विराटकडून कधी कोणती चूक झाली तर त्याला राजकुमार यांचा मार ही खावा लागला आहे.

 

”विराटला मी केवळ दम देत नसे. कारण केवळ दम दिल्याने तो ऐकायचा नाही. अनेकदा मला त्याला थोबाडीत मारावं लागलं आहे.”, असं राजकुमार म्हणाले. कोहली बालपणापासून त्याच्या फलंदाजीबाबत खूप दक्ष असायचा. प्रतिस्पर्धी संघ कमी धावांवर गारद झाला की विराट सलामीच्या फलंदाजीसाठी हट्ट करायचा. ‘मला बॅटिंग मिळाली नाही मग?’, असा निरागस प्रश्न तो नेहमी विचारायचा.

”कोहली नेहमी मोठ्या खेळाडूंमध्ये जाऊन खेळायचा. त्याच्या वयाचे खेळाडू त्याला बाद करण्यात अपयशी ठरायचे मग कोहलीला कंटाळा यायचा. त्यामुळे कोहली त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याचा हट्ट करायचा. त्यावेळी कोहली फक्त दहा वर्षांचा होता.”, असे राजकुमार म्हणाले.