ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आता माझे मित्र राहिलेले नाहीत, असे थेट विधान करून सर्वांना धक्का दिलेल्या विराट कोहलीने आता सावध पवित्रा घेतला आहे. मी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, मी काही मोजक्या खेळाडूंबद्दल तसं बोललो होतो, आजही बऱयाच खेळाडूंशी माझे चांगले संबंध आहेत आणि ते यापुढेही कायम राहतील. आयपीएलमध्ये आम्ही एकत्रच खेळतो, असे ट्विट कोहलीने केले आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघ अजूनही तुझे मित्र आहेत का? असे विचारण्यात आले होते. त्यावर कोहलीने स्पष्ट नकार देऊन आता सगळी परिस्थिती बदलली असल्याचे म्हटले होते. मैदानाबाहेर तुम्ही मित्रच असतात आणि खेळाच्या मैदानात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणूनच खेळायचं असतं, पण मी याबाबतीत चुकीचा ठरलो. पहिल्या कसोटीनंतर मी जे म्हटलं होतं, त्याबाबत मी चुकीचा सिद्ध झालो. ते आता मित्र राहिलेले नाहीत, असे कोहलीने म्हटले होते.

वाचा: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आता माझे मित्र नाहीत- विराट कोहली

विराटचे हे वक्तव्य ऑस्ट्रेलियातील माध्यमांना चांगलेच झोंबले होते. त्यांनी कोहली बालिश असल्याचे सांगितले. विराटचे वर्तन दर्जाहिन आणि बालिश असून तो गर्विष्ठ असल्याचेही ऑस्ट्रेलियन माध्यमांनी म्हटले. स्मिथने माफी मागितली, पण विराटने काही मोठेपणा दाखवला नाही, असेही माध्यमांनी म्हटले. या सर्व प्रकरणानंतर कोहलीने सावध पवित्रा घेत ‘डिफेन्सिव्ह’ खेळी खेळली आहे. धरमशाला कसोटीनंतर मी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाबाबत मी तसं बोललो नव्हतो. काही मोजक्या खेळाडूंबद्दल मी ते विधान केले होते. ज्या खेळाडूंसोबत माझे चांगले संबंध आहेत ते यापुढेही कायम राहतील. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणाऱया ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबतच्या नात्यात कोणताही बदल होणार नाही, असेही ट्विटमध्ये कोहलीने स्पष्ट केले आहे.