आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली असली तरी भारताचा सर्वोत्तम स्थानावरील फलंदाज तोच आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हशिम अमलाने दुसरे स्थान मिळवल्यामुळे कोहली एका स्थानाने खाली सरकला आहे. या दोघांमध्ये दोन गुणांचा फरक आहे. २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीला पुन्हा आपले स्थान मिळवण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी’व्हिलियर्सने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहाव्या स्थानावर स्थिर आहे, तर शिखर धवन एका स्थानाने खाली सरकून आता नवव्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचा सईद अजमल अव्वल स्थानावर आहे.
सांघिक यादीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तब्बल पाच वर्षांनी अग्रस्थान काबीज केले आहे, तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे.