भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारी शतकी खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करून दिला. केवळ शतकी कामगिरी नाही, तर केदार जाधवला साथीला घेऊन त्याने दोनशे धावांची भागीदारी देखील रचली. इंग्लंडच्या ३५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ६४/४ अशी केविलवाणी अवस्था असताना कोहलीने केदार जाधवच्या मदतीने मैदानात टीच्चून फलंदाजी करून विजय खेचून आणला. कोहलीच्या या कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. कोहली क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचतोय असे इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी म्हटले. नासीर हुसेन यांना ‘बीसीसीआय.टीव्ही’साठी दिलेल्या मुलाखतीमध्ये कोहलीने बऱ्याच विषयांवर भाष्य केले. कोहलीने इंग्लंडविरुद्ध आपले २७ वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले, तर कसोटीत त्याच्या नावावर १५ शतकं जमा आहेत. कोहली येत्या काही वर्षांत सचिनचाही विक्रम मोडीत काढेल असे बोलले जात असल्याचे नासीरने विचारले असता कोहलीने सचिनचा विक्रम मोडणे अशक्य असल्याचे विधान केले. तो म्हणाला की, मला इतका वेळ (२४ वर्षे) क्रिकेट खेळता येईल असे वाटत नाही. २०० कसोटी सामने आणि १०० शतकं हे आकडे अद्भूत आहेत. असे विक्रम मोडणे अशक्य असते. पण नक्कीच मला काहीतरी वेगळं नक्कीच करायचे आहे आणि चांगल्या कामगिरीनीशी शेवट करण्याची इच्छा नक्कीच आहे.

वाचा: इंग्लंड दौऱ्यानंतर तंत्रामध्ये बदल केला –  कोहली

 

इंग्लंडच्या धरतीवर २०१४ साली झालेल्या मालिकेतून देखील खूप काही शिकायला मिळाल्याचेही कोहली म्हणाला. ‘इंग्लंडच्या २०१४ साली झालेल्या मालिकेत मी स्वत:वर भरपूर दडपण घेतले होते. आशिया खंडातील खेळाडू बऱ्याचदा परदेशातील काही देशांमध्ये खेळण्याचे अधिक दडपण घेत असतात. या देशांमध्ये चांगली कामगिरी झाली, तरच तुम्ही चांगले क्रिकेटपटू आहात, असे समजले जाते. या देशांमध्ये चांगली कामगिरी झाली नाही की तुमचे खच्चीकरण व्हायला सुरुवात होते,’ असे कोहली म्हणाला. या दौऱ्यात नेमके काय चुकले, या प्रश्नावर कोहली म्हणाला की, ‘ इंग्लंडमध्ये खेळताना मला जास्त ‘इनस्विंगर’ येतील, असे मला वाटले होते, पण तसे झाले नाही. या दौऱ्यात मला जास्त चेंडू ‘आऊटस्विंगर’ टाकले गेले आणि त्यामुळे मी झटपट बाद होत गेलो.’