इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या महिला विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ सज्ज झाल्या आहेत. मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाचा सलामीचा सामना यंजमान इंग्लंड संघाविरुद्ध होणार आहे. आगामी महिलांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये किती उत्सुकता असेल, असा प्रश्न निर्माण झाला असताना भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीने मिताली ब्रिगेडचा खेळ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीने भारतीय महिला क्रिकेटला शुभेच्छा दिल्या असून, या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

विराटने शुभेच्छा संदेशात म्हटलंय की, भारतीय महिला संघाला आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा! मला विश्वास आहे की, या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. विराट कोहलीचा व्हिडिओ संदेश बीसीसीआयने अधिकृत अकांऊटवरुन शेअर केला आहे. कोहलीशिवाय भारतीय संघातील युवा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी देखील मिताली ब्रिगेडला शुभेच्छा दिल्या आहेत.

महिला विश्वचषक स्पर्धेला २४ जूनपासून सुरुवात होणार आहे. मितालीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सराव सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. या सामन्यात कर्णधार मितालीने ८५ धावांची दमदार खेळी केली होती. तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर २८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला होता. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी असून, साखळी सामन्यात प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत सात सामने खेळेल. भारतीय महिलांचा या स्पर्धेतील पहिला सामना शनिवारी २४ तारखेला इंग्लंडच्या महिलांसोबत खेळवण्यात येईल.