महेंद्रसिंह धोनीने निवृत्त व्हावे, असे म्हणणाऱ्या टीकाकारांना ‘माही’ने त्याच्या बॅटने उत्तर दिले. श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनीने अर्धशतक ठोकले असून धोनीच्या या कामगिरीचे श्रेय माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीला दिले आहे. कर्णधार विराट कोहलीने धोनीवर विश्वास दाखवल्यानेच धोनीला त्याच्या मनासारखी फलंदाजी करता आली, असे गांगुलीने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेमध्ये भारताची अवस्था ५ बाद ८७ अशी असताना धोनीने हार्दिक पांड्याच्या साथीने संघाचा डाव सावरला आणि भारताला २८१ धावांचा पल्ला गाठून दिला. धोनी- पांड्याच्या शतकी भागीदारीमुळे भारताला सामन्यात विजय मिळाला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

धोनीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले असून धोनीच्या या भन्नाट फॉर्मचे श्रेय गांगुलीने कोहलीला दिले आहे. ‘धोनी ३०० वन डे सामन्यांमध्ये खेळला आहे. धावा कशा काढायच्या हे त्याला माहिती आहे. धोनी त्याच्या कारकिर्दीत ९ हजारपेक्षा जास्त धावा करु शकतो. याचे श्रेय कर्णधार विराट कोहलीलाच दिले पाहिजे. कोहलीने धोनीवर विश्वास दाखवला आणि यामुळेच त्याला मनासारखी खेळी करता आली असे गांगुलीने सांगितले. कर्णधार खेळाडूवर किती विश्वास दाखवतो, यावर त्या खेळाडुचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे आज धोनी ज्याप्रकारे खेळतोय त्यामध्ये विराटचा वाटाही मोलाचा आहे, असे त्याने सांगितले. ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने हे मत मांडले.

यावेळी गांगुलीने हार्दिक पांड्याच्या कामगिरीचे कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसप्रमाणेच हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी भूमिका निभावू शकतो, असे गांगुलीने सांगितले. पांड्याच्या खेळीतून आत्मविश्वास झळकतो. तुम्ही गोलंदाजी किंवा फलंदाजी यापैकी एकात चांगली कामगिरी केली की, तुमचा आत्मविश्वास दुणावतोच, असे गांगुलीने स्पष्ट केले.