भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने इंडियन सुपर लीगमधील गोवा फुटबॉल क्लबचे सहमालकपदाचे हक्क विकत घेत फुटबॉलच्या मैदानात उडी घेतली आहे. भारतीय फुटबॉलला नवी झळाळी मिळवून देण्याचा ध्यास घेत फुटबॉलच्या रिंगणात उतरणारा कोहली हा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यानंतर तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.  
‘‘इंडियन सुपर लीग (आयएसएल) आणि गोवा संघाचा भाग असल्याचा अभिमान वाटत आहे. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू झिको यांच्या मार्गदर्शनाचा बराच फायदा भारतीय फुटबॉलपटूंना होणार आहे. तसेच फ्रान्स व अर्सेनलचा माजी खेळाडू रॉबर्ट पायरेस यांसारख्या अव्वल फुटबॉलपटूंसह गोवा संघ आयएसएलचे जेतेपद मिळवेल, असा विश्वास आहे. एकाच वेळी सर्व गोष्टींकडे लक्ष देणे कठीण असले तरी क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाल्यानंतर मी नक्कीच गोवा संघाच्या सामन्यांना हजेरी लावणार आहे,’’ असे गोवा संघाचा ‘सदिच्छा दूत’ असलेल्या कोहलीने सांगितले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात गोवा संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले, त्या वेळी झिको, पायरेस यांच्यासह गोवा संघाचे सहमालक श्रीनिवास डेम्पो, दत्ताराज साळगांवकर, वेणूगोपाळ धूत, बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि नीता अंबानी उपस्थित होत्या.
आयएसएलमधील गुंतवणुकीविषयी कोहली म्हणाला, ‘‘आयएलएल स्पर्धेला सुरुवातीला इतका प्रतिसाद मिळेल, असे वाटले नव्हते. पण गोवा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी झाल्यानंतर मला आयएसएलविषयी माहिती मिळाली. फुटबॉल हा माझा क्रिकेटनंतर सर्वात आवडता खेळ आहे. भारतातही फुटबॉलचा चाहतावर्ग प्रचंड आहे. निवृत्तीनंतरचा पर्याय आणि या स्पर्धेची संकल्पना आवडल्यानंतर मीसुद्धा फुटबॉलच्या मैदानात उडी घेतली. या स्पर्धेमुळे भारतीय युवा फुटबॉलपटूंचे कौशल्य आणि पायाभूत सोयीसुविधा सुधारण्यात मदत होणार आहे.’’

भारतीय फुटबॉलपटूंना बरेच काही शिकता येईल -झिको
इंडियन सुपर लीग स्पर्धेत पोर्तुगाल, इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांमधील अव्वल खेळाडू भाग घेणार आहेत. या खेळाडूंकडून भारताच्या युवा फुटबॉलपटूंना बरेच काही शिकता येणार आहे. या स्पर्धेद्वारे भारतीय फुटबॉलही यशाची शिखरे पादाक्रांत करेल, असा विश्वास ब्राझीलला तीन वेळा विश्वचषक जिंकून देणारे महान खेळाडू आर्थर अँटय़ुनेस कोइम्ब्रा अर्थात झिको यांनी व्यक्त केला. ‘‘आयएलएलचा भाग असल्याचा अभिमान असला तरी भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी अद्याप बरेच काही करावे लागणार आहे. गोवा संघाच्या सराव शिबिराला सुरुवात झाली असून भारतीय फुटबॉलसाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे ‘व्हाइट पेले’ म्हणून ओळखले जाणारे झिको म्हणाले.