भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका भारताच्या २-१ अशा विजयानिशी संपली. मालिकेपूर्वी, मालिका सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपासून ते क्रिकेट मंडळापर्यंत, माजी खेळाडूंपासून ते प्रसारमाध्यमांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टीकेची झोड उठवली होती. आता मालिका संपली तरी कोहलीला लक्ष्य करण्याची एकही संधी हे सारे अजून सोडताना दिसत नाही. आता ‘कोहलीद्वेष्टय़ा’ ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी तो हिणकस आणि अहंकारी आहे, असे म्हणत पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनाही कोहलीचे वक्तव्य आवडले नाही. दुसरीकडे चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेची स्तुती करताना ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी कोहलीला डिवचत ‘फोडा आणि राज्य करा’ ही कूटनीती अवलंबली आहे.

कोहली हिणकस आणि अहंकारी; ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांकडून टीका

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंशी यापुढे मैत्री करणार नाही, असे वक्तव्य भारताचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी केले होते. त्याच्या या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी कडाडून टीका केली आहे. कोहली हा अहंकारी तर आहेच, पण तो हिणकसही आहे, अशी टीका ऑस्ट्रेलियाच्या वर्तमानपत्रांनी केली आहे.

कोहलीने मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बीअर पिण्यासाठी आमंत्रण दिले होते, यावरही प्रसारमाध्यमांनी टीका केली. ‘डेली टेलिग्राफ’ या वर्तमानपत्राने ‘बीअरगेट : कोहलीचा नवीन दर्जाहीन प्रयोग’ असा मथळा छापला आहे.

‘‘मालिकेनंतर कोहलीने प्रतिस्पध्र्याबरोबर हस्तांदोलन करून यापुढचा विचार करायला हवा होता. पण तो एका लहान मुलासारखा वागतो. कोहली हा अहंकारी आहे,’’ असे ‘डेली टेलिग्राफ’ने म्हटले आहे.

‘दी ऑस्ट्रेलियन’ या वर्तमानपत्राने म्हटले आहे की, ‘‘जर या मालिकेतील दोन्ही संघांचा दर्जाच वाईट असता तर  मालिकेनंतर स्मिथने भारतीय संघाला मद्यपान करण्यासाठी बोलावले नसते.’’

‘हेराल्ड सन’ या वर्तमानपत्राने म्हटले आहे की, ‘‘मालिकेनंतर स्टीव्हन स्मिथने आपल्या कृत्यांबद्दल माफी मागितली. कोहलीनेही आता माफी मागायला हवी.’’

 

काळजीपूर्वक वक्तव्ये करायला हवीत -टेलर

सध्याच्या घडीला खेळाडू एकमेकांविरोधात आणि एकत्रितपणेही खेळताना पाहायला मिळतात. त्यामुळे आपण काळजीपूर्वक वक्तव्ये करायला हवीत. चांगली कामगिरी केलेला संघ जिंकतो, तर जास्त चांगली कामगिरी न करू शकलेला संघ पराभूत होतो; पण यापेक्षाही बऱ्याच गोष्टी मोठय़ा असतात. एक कर्णधार या नात्याने मालिकेनंतर प्रतिस्पर्धी संघाशी चांगली वागणूक ठेवायला हवी, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी सांगितले.

 

कोहलीने सचिन तेंडुलकरकडून शिकायला हवे -लॉइड

मैदानात आणि मैदानाबाहेर कसे वर्तन करायला हवे, हे विराट कोहलीने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडून शिकायला हवे. कोहलीने शांतपणे बसून एकदा सचिनच्या वर्तनाचा विचार करायला हवा आणि त्यानंतर वक्तव्य करायला हवे, असे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉइड यांनी सांगितले.

 

खेळताना किती माणसे कमवता, हेदेखील महत्त्वाचे -जोन्स

खेळ हा फक्त विजय-पराजय यावर अवलंबून नसतो, हे कोहलीने शिकायला हवे. त्याचबरोबर खेळताना तुम्ही किती माणसे कमवता, हेदेखील महत्त्वाचे असते, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्सने सांगितले.

 

कोहलीच्या वक्तव्यावर लेहमनही नाराज

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमनही भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्यावर नाराज झाले आहेत. कोहलीच्या वक्तव्याने मी निराश झालो असलो तरी त्याचे हे वैयक्तिक मत आहे, असे लेहमन यांनी सांगितले.

‘‘कोहलीने जे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंबाबत वक्तव्य केले त्याच्याशी भारतीय संघ सहमत असेल, असे मला वाटत नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाने मला प्रभावित केले आहे. माझ्या मते तो एक हुशार कर्णधार आहे,’’ असे लेहमन म्हणाले.

मालिकेबाबत लेहमन म्हणाले की, ‘‘आम्ही चांगला खेळ केला, पण भारताने आमच्यापेक्षा जास्त चांगला खेळ केला. चौथ्या कसोटी सामन्यात आमच्याकडून शंभर धावा कमी झाल्या. काही कसोटी सामन्यांमध्ये आमच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली.

एकंदरीत या मालिकेतून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आहे.’

 

रहाणेसारखा हंगामी कर्णधार मिळणे हे भारताचे सुदैव – चॅपेल

नवी दिल्ली : विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वशैलीमध्ये बराच फरक आहे. स्वत:मधील आक्रमकता राखत अजिंक्यने ज्या पद्धतीने नेतृत्व केले ते पाहता त्याच्यासारखा हंगामी कर्णधार मिळणे, हे भारताचे सुदैव आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

‘‘अजिंक्यसारखा कर्णधार मिळणे, ही भारतासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोख निभावली. या परिस्थितीत नेतृत्व करणे सोपे नव्हते, कारण जो जायबंदी झालेला कर्णधार आहे त्याची शैली भिन्न असते आणि त्यामुळे आपण नेमका कशा पद्धतीने संघ हाताळायला हवा, हा प्रश्न पडू शकतो. त्या वेळी आपल्या कर्णधाराच्या शैलीनुसारच आपण नेतृत्व करायचे, की स्वत:ची शैली वापरायची, हे ठरवायचे असते. रहाणेने स्वत:मधील आक्रमकता कायम ठेवत उत्तम पद्धतीने नेतृत्व केले,’’ असे चॅपल म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘‘शांतपणे नेतृत्व करत अजिंक्यने त्याच्यामधील आक्रमकताही दाखवली. एक कर्णधार म्हणून संघातील खेळाडूंवर तुम्ही विश्वास दाखवायचा असतो आणि त्यांच्या पाठिंब्याने मार्गक्रमण करायचे असते. ते अजिंक्यकडून पाहायला मिळाले.’’