सेहवागप्रमाणे आक्रमण करता न आल्याची गावस्करकडून खंत

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व त्याच्या सहकाऱ्यांच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी कसोटी विजयाची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्धही कायम राखावी, असे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सांगितले.

‘इनसाइड स्पोर्ट्स’तर्फे आयोजित केलेल्या  परिसंवादात गावस्कर आणि माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी भाग घेतला. गावस्कर यांनी लिहिलेल्या ‘सनी डेज’ या पुस्तकाला ४० वर्षे झाली. त्याबद्दलही गावस्कर यांचा गौरव करण्यात आला.

‘‘कसोटी मालिकांमध्ये सातत्यपूर्ण विजय मिळवणे हे आम्हाला शक्य झाले नाही. मालिकांमध्ये सर्वोत्तम विजय मिळवण्याचे आमचे स्वप्न कोहली व त्याचे सहकारी साकार करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. क्रिकेट कारकीर्दीला मी सुरुवात केली, त्यावेळी संघातील पाच सहा वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाले होते. त्यामुळे मी व माझ्या सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी आली होती. ही जबाबदारी पेलत असताना अपेक्षेइतकी मनमोकळेपणाने फलंदाजी करणे आम्हाला शक्य झाले नाही. सामन्यातील पहिल्या चेंडूवर षटकार खेचणे हे आम्हाला जमले नाही. वीरेंद्र सेहवागकडून अशी कामगिरी झाल्यामुळे आम्हालाही त्याचे खूप कौतुक वाटत असे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

‘‘ट्वेन्टी-२० हे अफलातून क्रिकेट आहे. यामध्ये सतत काहीतरी घडत असते. ट्वेन्टी-२०मुळे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील रंगत वाढली आहे,’’ असे लक्ष्मण यांनी सांगितले.