भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे. विराट प्रत्येकवेळी मैदानात मोठ्या जबाबदारीने फलंदाजीला उतरतो आणि चाहत्यांच्या अपेक्षा देखील वेळोवेळी पूर्ण करतो. वानखेडेवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत देखील कोहलीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत द्वीशतक ठोकले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने विराट कोहलीच्या द्वीशतकाच्या जोरावर आता मजबूत आघाडी घेतली आहे. कोहलीच्या द्वीशतकी खेळीनंतर माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले.

पाहा: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे अपडेट्स

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलत असताना सुनील गावस्कर यांनी कोहली हा दुसऱया ग्रहावरचा व्यक्ती असल्याचे म्हटले. सुर्यमालिकेत अद्याप ज्या ग्रहाचा शोध लागलेला नाही अशा दुसऱयाच ग्रहावरचा विराट कोहली आहे. संघाचा कर्णधार म्हणून तो खूप नवखा असला तरी तो जबाबदारीने फलंदाजी करतो. एक कर्णधार म्हणून त्याला येत्या काळात खूप शिकायला मिळेल आणि त्याच्या कामगिरीचा आलेख चढता राहिल, असे गावस्कर म्हणाले.

वाचा: या कसोटीमध्ये विराटने मोडले हे विक्रम…

कोहलीने आज वानखेडेवर कसोटी कारकिर्दीतील आपले तिसरे द्वीशतक साजरे केले. यंदाच्या वर्षात कोहली दमदार फॉर्मात आहे. २०१६ या वर्षात कोहलीने एक हजारहून अधिक धावा ठोकल्या असून तिन्ही द्वीशतके त्याने याच वर्षात ठोकली आहेत.