भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली माझ्यासाठी तो दहा वर्षांचा होता, तसाच आजही कायम आहे, असे मत कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले. क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत द्रोणाचार्य पुरस्काराने राजकुमार शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी बोलत असताना राजकुमार यांनी कोहलीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. प्रशिक्षकाची भूमिका ही खेळाडूच्या आई-वडीलांसारखीच असते, खेळाडूवर आपल्या मुलाप्रमाणेच लक्ष ठेवावे लागते, असे राजकुमार म्हणाले. मला मिळालेला पुरस्कार हा म्हणजे यापुढील काळात एक नाही, तर अनेक विराट कोहली घडविण्याची जबाबदारी वाढविणारा आहे. विराट दहा वर्षांचा असताना माझ्याकडे क्रिकेटचे धडे घेण्यासाठी आला होता तो दिवस मला आजही आठवतो आणि आजही तो नेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सरावासाठी आला तरी त्यात मला कोणताही बदल जाणवत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
राजकुमार यांना विराट कोहलीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हाचा क्षण यावेळी आठवला. ते म्हणाले की, जेव्हा विराटला २०१३ साली अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तेव्हा मी राष्ट्रपती भवनात उपस्थित होतो. पुढच्या वेळेस तुम्हाला द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला जाईल तेव्ही मी प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहून टाळ्या वाजवत असेन, असे विराट मला म्हणाला होता. येत्या २९ ऑगस्ट रोजी विराट पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित देखील राहणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.