मैदानावर रन्सचा पाऊस, मैदानाबाहेर कायम चर्चा यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली भारतात फेसबुकचा ‘किंग’ झाला आहे. क्रिकेट आणि बॉलीवूड हा कायम भारतात चर्चेचा विषय असतो. भारतात क्रिकेट आणि बॉलीवूडवर प्रेम करणाऱ्यांची, सेलिब्रिटींना फॉलो करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. या सगळ्या सेलिब्रिटींचे फेसबुकवर कोट्यवधी चाहते आहेत. चाहत्यांच्या फेसबुकवरील संख्येत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नंबर वन ठरला आहे. मैदानावर धावांचा रतीब घालणाऱ्या कोहलीच्या फेसबुकवरील चाहत्यांच्या संख्येबद्दल बोलताना ‘विराट’ या एकाच शब्दात होऊ शकते. कारण विराटच्या फेसबुकवरील चाहत्यांची संख्या तब्बल साडे तीन कोटींहून अधिक आहे. कोहलीने बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खानलादेखील मागे टाकले आहे. सलमानसोबतच बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनादेखील विराट कोहलीने फेसबुकवर धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे विराट कोहली भारतात फेसबुकचा अनभिषिक्त सम्राट झाला आहे.

विराट कोहलीच्या फेसबुकवरील चाहत्यांची संख्या तब्बल ३ कोटी ५७ लाख २५ हजार ७१९ इतकी आहे. तर दबंग सलमानच्या फेसबुकवरील चाहत्यांची संख्या ३ कोटी ५१ लाख १६ हजार ९२४ इतकी आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आहे. दीपिकाच्या फेसबुकवरील चाहत्यांची संख्या ३ कोटी ४० लाख ४८ हजार २०० इतकी आहे. विशेष म्हणजे फेसबुकवर विराटचे चाहते मोठ्या प्रमाणात सक्रीयदेखील असतात. विराटच्या फोटोंना, पोस्टना अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारो लाईक्स मिळतात. यासोबतच मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराटच्या फोटांवर, पोस्टवरदेखील लाईक्सचा पाऊस पडतो. विराट कोहली मैदानावर ज्याप्रकारे प्रत्येक फटक्यावर आपली हुकूमत दाखवतो, त्याचप्रकारे फेसबुकवर कमेंट, लाईक, शेअर मिळवण्यातही विराट कोहलीची हुकूमत दिसून येते. लाखो लाईक्स आणि हजारो लाईक्स विराटच्या फोटोंसाठी, पोस्टसाठी जणू नित्यक्रमच झाला आहे.

मैदानावरील दमदार कामगिरी असो वा मैदानाबाहेरचे एखादे फोटोशूट, विराट कोहलीचे फोटो कायमच फेसबुकवर चर्चेचा विषय ठरतात. विराट कोहली मैदानावर जबरदस्त कामगिरी करतो. मैदानावर धमाकेदार बॅटिंग करणाऱ्या विराट कोहलीला चाहते फेसबुकवर अक्षरश: डोक्यावर घेतात. यासोबतच विराट कोहलीने सहज म्हणून मैदानाबाहेरील क्लिक केलेला एखादा फोटोदेखील लाखो लाईक्स, हजारो कमेंट्सचा ‘स्कोअर’ करतो. विराटच्या मैदानावरील कामगिरीप्रमाणेच त्याच्या चाहत्यांच्या प्रेमातदेखील जबरदस्त ‘सातत्य’ आहे, असे म्हणता येईल. कारण मैदानावर ज्याप्रकारे विराट धावांची टांकसाळ उघडतो, त्याचप्रमाणे विराटचे चाहतेदेखील त्याच्यावर सतत अविरतपणे प्रेमाचा वर्षाव करत असतात. ‘विराटचे कोट्यवधी चाहते असतील, तर त्यात मी एक असेन. विराटचे लाखो चाहते असतील, तर त्यात मी एक नक्कीच असेन. विराटचे हजारो चाहते असतील, तर त्यातील एक चाहता मी नक्कीच असेन. विराटचे शेकडो चाहते असतील, तरीही मी त्यात असेन आणि जर विराटचा एकच चाहता असेल, तर तो मीच असेन,’ अशा ‘विराट’ प्रेमाच्या प्रतिक्रिया कोहलीच्या फोटोखाली हजारोंच्या संख्येने वाचायला मिळतात.

ग्राफिक सौजन्य- सोशल बेकर्स
ग्राफिक सौजन्य- सोशल बेकर्स

सोशल मीडियावरील आकडेवारीवर नजर टाकल्यावर फेसबुकवर बॉलीवूड जगतातील अनेकांचा बोलबाला पाहायला मिळतो. सलमान खान, दीपिका पदुकोन, प्रियांका चोप्रा, हनी सिंग, श्रेया घोषाल, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, कपिल शर्मा असे एकापेक्षा एक कलाकार भारतीय चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. भारतातील टॉप १० सेलिब्रिटींचा विचार केल्यास ८ नावे मनोरंजन क्षेत्रातील आहे. यामध्ये क्रिकेट विश्वातील केवळ दोन जणांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर टॉप १० मध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली थेट पहिल्या क्रमांकावर. विराट कोहलीने अनेक मातब्बरांना मागे टाकून भारतीय फेसबुकवर अव्वल स्थान पटकावले आहे. मैदानावर दिग्गजांची धुलाई करणारा कोहली फेसबुकवरदेखील दिग्गजांना धोबीपछाड देताना दिसतो आहे.