जगभरातील क्रिकेट चाहते भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची प्रशंसा करत असले तरी आपल्या कामगिरीवर विराट समाधानी नाही. आपल्या फिटनेसमध्ये आणखी वाढ करण्याची गरज असल्याचे विराटने म्हटले आहे. एक सरासरी क्रिकेटपटू म्हणून आपल्याकडे पाहिले जावे, असे मला अजिबात वाटत नाही. मला जगातील सर्वोत्तम व्हायचं आहे. यादृष्टीने माझी मानसिक तयारी पूर्ण झालेली असते, पण फिटनेस अजूनही कमी पडत असल्याची कबुली विराटने दिली आहे. तो म्हणाला की, २०१२ सालच्या आयपीएलपर्यंत मी माझ्या फिटनेसवर अपेक्षित लक्ष देत नव्हतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी काय खाल्ले पाहिजे, कितीवेळ व्यायाम केला पाहिजे, याची कशाचीही नोंद मी ठेवत नसे. पण त्या आयपीएलनंतर मी माझ्या फिटनेसवर जास्त लक्ष देऊ लागलो. मला माझ्या फिटनेसचा एक नवीन अध्याय सुरू करायचा आहे. कारण, मला सरासरी खेळाडू व्हायचे नाही. मला सर्वोत्तम व्हायचे आहे. यासाठी माझ्या मनाची पूर्ण तयारी आहे, पण अजूनही फिटनेस कमी पडत असल्याचे मला वाटते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर ११ कसोटी शतके आणि २५ एकदिवसीय शतकांची नोंद आहे. पण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाकडे जो फिटनेस असायला हवा, तितका फिटनेस अद्याप आपल्यात नसल्याचे विराटचे म्हणणे आहे. जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा तुम्हाला आपण काहीही करू शकतो असे वाटते. काही वर्षांपूर्वी माझ्या क्षेत्ररक्षणात चपळता नव्हती. पण फिटनेसकडे बारकाईने लक्ष दिल्यानंतर माझ्या चपळतेत वाढ झाली, असेही तो पुढे म्हणाला.