कोहली, मुरलीची शानदार शतके; भारताकडे ५१ धावांची आघाडी

वानखेडे स्टेडियम एका ऐतिहासिक स्थित्यंतराचे साक्षीदार ठरले. तब्बल दोन तपे आपल्या फलंदाजीच्या जादूने क्रिकेटरसिकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या अखेरच्या सामन्यात ‘सचिन.. सचिन..’ हा नाद वानखेडेवर अखंड घुमत होता. त्यानंतर वानखेडेवर झालेल्या या पहिल्यावहिल्या कसोटीत ‘विराट.. विराट..’ हा जयघोष घुमत होता. तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले, या उक्तीला साजेशी अशीच विराटची फलंदाजी होती. विराट आणि सलामीवीर मुरली विजयच्या शतकी खेळींच्या बळावर भारताने चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४५१ अशी मजल मारली आहे. त्यामुळे ५१ धावांची हीच आघाडी आणखी वाढवत भारताला विजयाची आस धरता येऊ शकते.

शनिवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने ‘विराटदिन’ होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सहा तास मैदानावर पाय रोवून आक्रमकपणे फलंदाजी करणारा विराट २४१ चेंडूंत १७ चौकारांसह १४६ धावांवर खेळत आहे. विराटचे हे १५वे कसोटी शतक. या मॅरेथॉन खेळीत त्याने आणखी काही महत्त्वाचे टप्पेसुद्धा ओलांडले. २०१६ या कॅलेंडर वर्षांत त्याने एक हजार धावांचा टप्पा पार केला, तर कसोटी कारकीर्दीतील चार हजार धावा पूर्ण केल्या. इंग्लंडचा वेगवान मारा असो वा फिरकी किंवा धोकादायक वाटणारा जेम्स अँडरसन विराटने साऱ्यांना निष्प्रभ केले. त्याच्या बॅटीतून सुसाट वेगाने फटके सीमारेषेपार जात होते. या त्याच्या नजराण्यांना चाहत्यांची तितकीच उत्कट ‘विराट.. विराट..’ अशी दादसुद्धा मिळत होती. त्याच्या खेळीविषयी विजय म्हणाला, ‘‘विराटच्या पदार्पणापासून मी त्याचा खेळ पाहतो आहे. दिवसेंदिवस तो आणखी तेजाने तळपतो आहे.’’

त्याआधी मुरली विजयने कसोटी कारकीर्दीतील आठवे आणि इंग्लंडविरुद्ध तिसरे शतक साकारले. विजयने २८२ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांसह १३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारून राजकोट कसोटीनंतर पुन्हा सूर गवसल्याची ग्वाही दिली. विराटसोबत विजयने ११६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आदिल रशिदने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत विजयला माघारी धाडले. विजयने आपल्या खेळीविषयी सामन्यानंतर सांगितले की, ‘‘आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद होतो, अशी जोरदार टीका माझ्यावर गेले काही दिवस होत होती. परंतु या कसोटीआधी मिळालेल्या विश्रांतीच्या कालखंडात या टीकेचा मी अजिबात विचार केला नाही. माझ्यातील क्षमतेचा शांतपणे अभ्यास केला आणि खंबीरपणे परतलो.’’

दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा कामचलाऊ फिरकी गोलंदाज जो रूटने पार्थिव पटेल (१५) आणि रविचंद्रन अश्विन (०) यांना लागोपाठच्या षटकांमध्ये बाद करून इंग्लंडच्या आशा उंचावल्या. भारताचे उर्वरित संघ फार मजल मारू शकणार नाही, असे इंग्लिश संघाला वाटले. मात्र विराटला ते नामंजूर होते. रवींद्र जडेजा आणि जयंत यादव यांना साथीला घेत त्याने आणखी दीडशे धावांची भर घातली. विराटने जडेजासोबत सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली, यात विराटचे योगदान होते २५ धावांचे. तर जयंत यादवसोबत रचलेल्या आठव्या विकेटसाठीच्या अखंडित ८७ धावांच्या भागीदारीत जयंतचा वाटा आहे ३० धावांचा. तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे विश्लेषण करताना विजय म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटला योग्य अशी खेळपट्टी आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही ती छान न्याय देते आहे. विराट आणि जयंतची फलंदाजी पाहता भारताला चांगली आघाडी मिळण्याची चिन्हे आहेत.’’

धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ४००

  • भारत (पहिला डाव) : लोकेश राहुल त्रि. गो. अली २४, मुरली विजय झे. आणि गो. रशीद १३६, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. बॉल ४७, विराट कोहली खेळत आहे १४७, करुण नायर पायचीत गो. अली १३, पार्थिव पटेल झे. बेअरस्टो गो. रूट १५, रविचंद्रन अश्विन झे. जेनिंग्स गो. रूट ०, रवींद्र जडेजा झे. बटलर गो. रशीद २५, जयंत यादव खेळत आहे ३०, अवांतर १४ (बाइज ५, लेगबाइज ७, वाइड २), एकूण १४२ षटकांत ७ बाद ४५१
  • बाद क्रम : १-३९, २-१४६, ३-२६२, ४-२७९, ५-३०५, ६-३०७, ७-३६४
  • गोलंदाजी : जेम्स अँडरसन १५-५-४३-०, ख्रिस वोक्स ८-२-३४-०, मोईन अली ४५-५-१३९-२, आदिल रशीद ४४-५-१५२-२, जेक बॉल १४-५-२९-१, बेन स्टोक्स ८-२-२४-०, जो रूट ८-२-१८-२.

वानखेडेची खेळपट्टी ही कसोटी क्रिकेटसाठी आदर्शवत आहे. या सामन्यात आम्ही घेतलेली आघाडी फार मोलाची ठरणार आहे. या आमच्यासाठी सुवर्णधावा आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये माझ्याकडून चांगली कामगिरी होत नव्हती. त्यामुळे या सामन्यापूर्वी मी माझ्या खेळातील काही गोष्टींवर भर दिला. विराट कोहली हा सध्या त्याच्या कारकीर्दीच्या उत्तुंग शिखरावर आहे. त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.   मुरली विजय, भारताचा सलामीवीर

या सामन्यात काही झेल टिपण्याच्या संधी आम्ही सोडल्या. विराट कोहलीचा आदिल रशिदकडून सुटलेला झेल सोपा नव्हता; पण आम्हाला या गोष्टीवर अधिक मेहनत घ्यावी लागेल. आम्ही दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली; पण कोहलीने दमदार फलंदाजी करत भारताच्या बाजूने पारडे झुकवले. रविवारी भारताच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून त्यांच्यासमोर मोठे आव्हान ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.  जो रूट, इंग्लंडचा फलंदाज