कर्णधार म्हणून परिपक्व होण्यासाठी विराट कोहलीने भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आणि याबाबतीत तो महेंद्रसिंग धोनीकडून खूप गोष्टी शिकू शकतो असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ याने व्यक्त केले.
‘‘कोहलीने संतुलित होण्याची आवश्यकता आहे. विश्वचषकादरम्यान त्याच्या वर्तनाचीही चर्चा झाली. त्याला लवकर राग येतो. तो भावनिकदृष्टय़ा विचार करतो आणि काही गोष्टींचा वैयक्तिक पातळीवर विचार करतो. कर्णधार म्हणून शांत आणि संयमीपणा वागण्यात असायला हवा. धोनी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तो कशानेच विचलित होत नाही. वर्तनाच्या संदर्भात कोहलीसाठी धोनी सुरेख आदर्श आहे. त्याने नैसर्गिक स्वभावाला मुरड घालायला नको मात्र धोनीकडून काही गोष्टी नक्कीच शिकू शकतो’’, असे वॉ यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘कोहलीची खेळाप्रती असलेला उत्साह मला भावतो. कर्णधार असताना प्रत्येक मुद्यावर तुम्ही वादविवाद करू शकत नाही. त्यावेळी त्याला रोखायला हवे. कोहलीच्याच वयाचा स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व करतो. पण त्याच्या बाबतीत असे होत नाही. कोहलीकडे सर्वोत्तम तंत्र आहे तर स्मिथकडे अचूक स्वभाव आहे. दोघेही प्रतिभावान खेळाडू आहेत आणि आगामी काळात त्यांच्या नावाचा बोलबाला असणार आहे.’’