क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱया राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने यावर्षी भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे, तर ‘अर्जुन पुरस्कारा’साठी फलंदाज अजिंक्य रहाणेचे नाव सुचविण्यात आले आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकात केलेल्या दमदार कामगिरीबद्दल विराटला खेलरत्नने गौरविण्यात यावे, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. विराटने तीन महत्त्वपूर्ण सामन्यांत अर्धशतकं झळकावून संघाला विजय प्राप्त करून दिला होता. विराटच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचा सन्मान देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने व्हावा, अशी शिफारस बीसीसीआयने केली आहे. विराटने ट्वेन्टी-२० विश्वचषकात १३६.५० च्या सरासरीने २७३ धावा ठोकल्या होत्या. आजवर केवळ दोन क्रिकेटपटूंना खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला १९९७-९८ साली आणि आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला २००७ साली खेलरत्नने सन्मानित करण्यात आले होते. यंदा खेलरत्नसाठी नेमबाज जितू राय, स्वॉशपटू दीपिका पल्लिकल, टिंटू लुका, गोल्फपटू अनिर्बन लाहिरी हे क्रीडापटूही शर्यतीत आहेत.