भारतीय संघाने आपल्या ऐतिहासिक ५०० व्या आंतरराष्ट्रीय कसोटी विजय प्राप्त केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केला, पण उरीतील हल्ल्याबाबत बोलताना कोहलीला दु:ख अनावर झाले. एक भारतीय म्हणून या हल्ल्याने नक्कीच मनाला तीव्र वेदना झाल्या. अशा घटनांमुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनाला वेदना होतात, सीमा रेषेवर वारंवार होणारे हल्ले हे अत्यंत दुर्देवी आहे, अशा शब्दांत विराट कोहीलीने आपली भावना व्यक्त केली.

वाचा: …म्हणून भारतीय संघाला ५०० वी कसोटी जिंकता आली

काश्मीर खोऱयातील उरी येथील भारताच्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवाने शहीद झाले होते. उरीतील हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचीही माहिती पुढे आली. भारतीय जवानांनीही प्रत्युत्तरात १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सध्या या हल्ल्याची लष्करी चौकशी सुरू आहे.

वाचा: कानपूर कसोटीतील पराभवानंतर न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का

कानपूरमधील कसोटी विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना विराट कोहलीने उरीतील हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त केले. तो म्हणाला की, मी एक भारतीय आहे आणि देशातील प्रत्येक भारतीयाला या हल्ल्यामुळे वेदना झाल्या असतील. हल्ल्यामुळे आपल्यालाच इतक्या वेदना झाल्या तर जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना किती वेदना झाल्या असतील याची कल्पनाही करता येत नाही. शहीद झालेल्या जवानांना माझा सलाम आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

 

वाचा: भारतीय संघाची ऐतिहासिक ५०० व्या कसोटीवर विजयी मोहोर

भारतीय संघाने कानपूर कसोटी १९७ धावांनी जिंकली. या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी फिरकीपटू अश्विनने आपल्या फिरकी जादूने किवींना गारद केले. अश्विनने दुसऱया डावात तब्बल ६ विकेट्स घेतल्या, तर जडेजाने एका फलंदाजाला माघारी धाडले. मोहम्मद शमीनेही दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवरील भारतीय संघाची ही ५०० कसोटी होती. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने या कसोटीवर विजयी मोहोर उमटवली. दोन्ही डावात मिळून अश्विनने एकूण १० विकेट्स घेतल्या, तर जडेजाच्या खात्यात ६ विकेट्स जमा झाल्या.  चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी दोन्ही डावात भारतीय संघाकडून शतकी भागीदारी रचली. मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी आणि सहा विकेट्स मिळवणाऱया रविंद्र जडेजाला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.