भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील सध्याची कसोटी मालिका रंगतदार लढाईवरून नाही, तर मैदानात घडलेल्या खेळाडूंमधील बाचाबाचीच्या प्रकरणावरून गाजताना दिसत आहे. गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे आपण पाहिले. त्यात कोहली आणि स्मिथ यांचे शाब्दीक द्वंद्व चर्चेचा विषय ठरले. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान हिली यांनी कोहलीवर टीका देखील केली होती. बंगळुरू कसोटीत कोहलीने स्मिथला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर माझ्या मनातील आदर त्याने गमावला असल्याचे वक्तव्य हिली यांनी केले होते. हिली यांच्या वक्तव्याबाबत कोहलीला विचारण्यात आले असता त्यानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले.

त्यांच्या डोळ्यात (इयान हिली) मी आदर गमावला असला तरी माझ्या देशातील १२० कोटी जनता आपल्यासोबत आहे. एका व्यक्तीच्या वेगळ्या वागणुकीमुळे माझ्या आयुष्यावर काही परिणाम होणार नाही आणि मला वाटतं तुम्ही यूट्युबवर जाऊन त्यांचेही व्हिडिओ सर्च करून पाहा. इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात लेग साईडवर यष्टीरक्षकाकरवी त्यांना झेलबाद घोषित करण्यात आले त्यावेळी हिली यांनी भर मैदानात व्यक्त केलेला राग त्यावेळी सर्वांनी पाहिला होता. मला वाटतं तुम्ही नक्की युट्यूबवर जाऊन तो व्हिडिओ पाहावा आणि त्यानंतर मला यावर प्रश्न विचारा, असे कोहलीने म्हटले.

कोहलीने इयान हिली यांचे नमूद केलेले व्हिडिओ युट्यूबवर माध्यमांकडून शोधून काढण्यात आले आणि आते ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. इयान हिली यांनी पंचांनी चुकीचा निर्णय दिल्यामुळे पव्हेलियनमध्ये परतत असताना मैदानातच राग व्यक्त केला होता. ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करण्याआधी हिली यांनी बॅट फेकून दिली होती. याशिवाय, पंचांबद्दल अपशब्द देखील काढले होते.

अशाच आणखी एका सामन्यात इयान हिली यांच्या यष्टीरक्षणातील फसवेपणा समोर आला होता. वेस्ट इंडिजाचा माजी फलंदाज ब्रायन लारा फलंदाजी करतेवेळी इयान हिली यांनी त्याला धावचीत केले. खरंतर हिली यांनी आपल्या हाताने यष्टी उडवल्या होत्या, हे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले होते. पंचांनी सत्यता जाणून घेण्यासाठी हिली यांना विचारणा केली होती. त्यावर हिली यांनी आपण रितसर लाराला स्टम्पिंग केल्याचे सांगितले होते. हिली यांनी त्यावेळी खिलाडूवृत्तीला तिलांजली दिल्याच्या प्रतिक्रिया क्रिकेट विश्वात उमटल्या होत्या.