पहिल्या सराव सामन्यात भारताची न्यूझीलंडवर मात; डकवर्थ-लुइस नियमाआधारे ४५ धावांनी विजय

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेचे विजेतेपद राखण्यासाठी इंग्लंडमध्ये आलेल्या भारतीय संघाचा प्रारंभ अतिशय शानदार झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्यावहिल्या सराव सामन्यात डकवर्थ-लुइस नियमाच्या आधारे भारताने ४५ धावांनी विजयाची नोंद केली आहे. कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवनला गवसलेला सूर हे भारताच्या दृष्टीने दिलासादायक ठरले आहे.

न्यूझीलंडचे १९० धावांचे आव्हान पेलताना भारताने २६ षटकांमध्ये ३ बाद १२९ अशी दमदार मजल मारली असताना पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. डकवर्थ-लुइस नियमानुसार भारताला २६ षटकांत ८४ धावा करणे आवश्यक होते.

भारताकडून अजिंक्य रहाणे (७) आणि दिनेश कार्तिक यांनी निराशा केली. मात्र धवन (४०) आणि कोहली (नाबाद ५२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी बहुमोल ६८ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पावसाचे आगमन होण्यापूर्वी धोनीनेही आक्रमण करताना २१ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह नाबाद १७ धावा केल्या.

त्याआधी, भारताने न्यूझीलंडचा डाव फक्त १८९ धावांत गुंडाळला.  मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार  यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

  • न्यूझीलंड : ३८.४ षटकांत सर्व बाद १८९ (ल्युक राँची ६६, जेम्स नीशाम ४६; भुवनेश्वर कुमार ३/२८, मोहम्मद शमी ३/४७, रवींद्र जडेजा २/८) पराभूत वि. भारत : २६ षटकांत ३ बाद १२९ (विराट कोहली नाबाद ५२, शिखर धवन ४०; जेम्स नीशाम १/११)

 

इंग्लंडच्या विजयात स्टोक्सचे योगदान

साऊदम्पटन : इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. बेन स्टोक्सच्या शानदार शतकाच्या बळावर इंग्लंडला हा विजय साकारता आला.

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या स्टोक्सला पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांनी जीवदान दिले. तेच नंतर महागात पडले. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एकंदर सहा झेल सोडले.

जागतिक एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या  दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या दोन षटकांमध्ये २० धावांची आवश्यकता होती. मात्र डेव्हिड मिलरने (नाबाद ७१) दोन लागोपाठच्या चेंडूंवर अनुक्रमे षटकार आणि चौकार खेचून ही दरी कमी केली. त्यानंतर शेवटच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. मात्र दडपणाच्या स्थितीत मार्क वूडने फक्त ५ धावा देत संघाला विजय मिळवून दिला.

त्याआधी, स्टोक्सच्या १०१ धावा आणि जोस बटलरचे धडाकेबाज अर्धशतक (नाबाद ६५) या बळावर इंग्लंडने ६ बाद ३३० धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ९८ धावा केल्या, तर ए बी डी’व्हिलियर्स आणि मिलर यांनी अर्धशतके झळकावली.

चेंडूच्या छेडछाडीचे आरोप झाल्यामुळे डी’व्हिलियर्स संतप्त

इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघावर आता चेंडूच्या छेडछाडीचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे संतप्त झालेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्सने आमच्या संघाने कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

डी’व्हिलियर्सकडून इंग्लंडच्या डावात चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास येत आहे. चेंडूचा आकार बदलला आहे, त्याला दक्षिण आफ्रिकेचा संघ जबाबदार राहणार नाही, असे आपण पंच ख्रिस ग्रॅफनी आणि रॉब बेली यांच्या निदर्शनास आणल्याचे डी’व्हिलियर्सने स्पष्ट केले आहे..