मुंबईकर श्रेयस अय्यरला पाचारण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ‘विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया’ असे स्वरूप प्राप्त झाले आहे. मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने धरमशाला कसोटी जिंकणे दोघांसाठी क्रमप्राप्त आहे. मात्र यंदाच्या हंगामात भन्नाट सूर गवसलेला विराट खांद्याच्या दुखापतीतून अद्यापही पूर्णपणे सावरलेला नाही. कसोटीच्या तयारीसाठी आयोजित सराव सत्रात कोहली सहभागी झाला, मात्र त्याने फलंदाजी केली नाही. विराटच्या तंदुरुस्तीविषयी साशंकता असल्याने मुंबईकर श्रेयस अय्यरला पाचारण करण्यात आले आहे. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाच्या ‘बोलंदाजी’ला प्रत्युत्तर देणारा कोहली संघात नसणे भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे. कोहली खेळू न शकल्यास उपकर्णधार अजिंक्य राहणकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येऊ शकते.

‘डीआरएस’च्या मुद्दय़ावरून विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन संघावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने स्वत:ची चूक मान्य केली होती. मात्र संघाबाबतच्या आरोपांचे खंडन केले होते. विराटच्या खांद्याला झालेल्या दुखापतीची ग्लेन मॅक्सवेलने खिल्ली उडवली होती. कर्णधार स्टीव्हन स्मिथवरही हाच आरोप झाला होता. मात्र टेलिव्हिजन पुनप्र्रक्षेपणात तो आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले होते. या सगळ्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी कोहलीवर ‘जागतिक क्रीडा क्षेत्रातील ट्रम्प’ अशी बोचरी टीका केली होती. धरमशाला कसोटीत ही खडाजंगी आणखी तीव्र होण्याची चिन्हे होती. मात्र दुखापतीने हैराण कोहलीच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी कोहलीची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येईल. त्या निर्णयावर त्याचा समावेश अवलंबून असेल.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात द्विशतकी खेळी साकारणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरला कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कोहलीसाठी पर्यायी राखीव खेळाडू म्हणूनच श्रेयसची निवड करण्यात आल्याचे संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडणाऱ्या श्रेयसला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे.

सरावादरम्यान कोहलीच्या खांद्याला बँडेज बांधण्यात आले होते. खांद्यावर ताण येऊ नये म्हणून त्याने फलंदाजी करणे टाळले. कोहलीचा स्वभाव लक्षात घेता धरमशाला कसोटीत तो खेळण्याचीच शक्यता जास्त आहे.

शमी खेळणार नसल्याचे स्पष्ट

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीबाबत फिजिओ पॅट्रिक फरहार्ट अद्याप समाधानी नसल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘‘शमी रांची येथेसुद्धा भारतीय संघासोबत होता. फॅरहार्ट त्याच्या तंदुरुस्तीची बारकाईने पाहणी करीत आहेत. भारताच्या १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विजय हजारे क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते,’’ अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

स्टीव्ह ओ’कीफऐवजी जॅक्सन बर्डचा समावेश?

धरमशाला : पुण्याच्या पहिल्या कसोटी सामन्यातील नायक स्टीव्ह ओ’कीफऐवजी शनिवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्डचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश होण्याची शक्यता आहे. धरमशालाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असल्यामुळे कर्णधार स्टीव्ह स्मिथ चेंडूला योग्य उसळी देणाऱ्या बर्डचा संघात समावेश होऊ शकेल.

चेंडूला चांगली उसळी मिळेल!

धरमशाला : चौथ्या कसोटीसाठी चेंडूला उसळी मिळणारी खेळपट्टी तयार करण्यात आलेली आहे. खेळपट्टी कशी असावी या संदर्भात भारतीय संघव्यवस्थापनाने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यांनी आमच्या कामकाजात हस्तक्षेप केलेला नाही, असे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे क्युरेटर सुनील चौहान यांनी सांगितले. ‘‘धरमशालाची खेळपट्टी पारंपरिकच आहे. चेंडू कट आणि पूल करणाऱ्या फलंदाजांसाठी ही खेळपट्टी अनुकूल आहे. चेंडूला चांगली उसळी मिळणार असल्याने गोलंदाजांनाही ही खेळपट्टी पोषक ठरेल. कसोटी निर्णायक होईल अशीच खेळपट्टी तयार केली आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

विराट कोहली हा लढवय्या संघनायक आहे. आपल्या संघाचे आणि राष्ट्राचे हित तो जाणतो. धरमशाला कसोटीत तो अपेक्षित खेळी साकारेल. ही मालिका विलक्षण रंगतदार ठरत आहे. मात्र दोन्ही संघांनी वाद संपवण्याची नितांत आवश्यकता आहे.२००८च्या वादग्रस्त ‘मंकीगेट’ प्रकरणाप्रमाणे सध्याचे प्रकरण चिघळू नये, यासाठी दोन्ही संघांनी सामोपचाराने वागावे.    –अ‍ॅडम गिलख्रिस्ट, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार