भारतीय संघाची ‘रन मशीन’ म्हणून ओळख निर्माण झालेला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने याने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वानखेडे कसोटीत कोहलीने दोन विक्रम रचून माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. दमदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने आज कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात १ हजार धावा आणि कारकिर्दीतील ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक जलद गतीने चार हजार धावा केल्या आहेत.

पाहा: भारत विरुद्ध इंग्लंड वानखेडे कसोटीचे लाइव्ह अपडेट्स

विराट कोहलीने २०१६ या वर्षभराच्या कालावधीत ११ कसोटी सामन्यांमध्ये तब्बल ७१.५० च्या सरासरीने हजार धावा ठोकल्या. यापूर्वी राहुल द्रविड याने २०११ साली एका वर्षात हजार धावा केल्या होत्या. विराटने आज वानखेडे कसोटीत तिसऱया दिवशी अर्धशतकी खेळी साकारली असून त्याने वर्षभरात हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. एक हजार धावांचा विक्रम केल्यानंतर कसोटी कारकिर्दीतील ४ हजार धावांचा टप्पा गाठण्याचाही पराक्रम विराटने केला आहे. ५२ कसोटी सामन्यांतील ८९ डावांत कोहलीने ४८ च्या सरासरीने चार हजार धावा केल्या आहेत. विराटच्या या चार हजार धावांमध्ये १४ शतकं आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.

सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर विराट कोहली एकामागोमाग अनेक विक्रमांची नोंद करत आहे. कोहलीने आपल्या विश्वासू खेळींनी भारतीय संघाचा आश्वासक फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. धोनीने  कसोटीमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर कोहली संघाच्या कर्णधारपदाची धुरा देखील उत्कृष्टपणे सांभाळत आहे.