ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी फलंदाजी क्रमावरून भारतीय ड्रेसिंग रुममध्ये केवळ संभ्रमावस्था झाली होती. त्यावर चर्चेनंतर पटकन तोडगाही काढण्यात आला होता. यावरून सुरु असलेल्या शिखर धवन आणि विराट कोहली यांच्यातील भांडणाच्या काल्पनिक कथा रंगवल्या जात असल्याचे स्पष्टीकरण धोनीने दिले आहे.
शेवटच्या क्षणी कोहलीला फलंदाजी करण्यास पाठविण्यात आल्याने केवळ संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याहून अधिक काहीच नाही, असे धोनीने स्पष्ट केले. भारतीय ड्रेसिंग रुममधील अशांततेच्या वृत्तावरून पत्रकार परिषदेत कर्णधार धोनीवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. यावर बोलताना धोनीने, “हो, विराट कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये शिखर धवनला चाकूने भोसकले. त्यानंतर धवन बरा देखील झाला आणि आम्ही त्वरित त्याला फलंदाजीला पाठवले सुद्धा.” असा विनोद करत धवन आणि विराटच्या भांडणाच्या काल्पनिक रंजक कथा रंगवल्या जात असल्याचे धोनीने म्हटले.
तसेच अशाप्रकारच्या कथा केवळ प्रसिद्धीसाठी छापल्या जात असून या कथा चित्रपटासाठी चांगल्या ठरतात. ज्यांना यावर चित्रपट बनवायचा असेल त्यांनी तो खुशाल बनवावा, असा टोमणाही धोनीने यावेळी लगावला. अशाप्रकारच्या कथा कुठून बाहेर येतात मला काहीच समजत नाही. आणि जर संघातील खरंच कोणी तुम्हाला सांगितलं असेल तर, त्याचं नाव देखील आम्हाला सांगा, हे अतिशय महत्त्वाच ठरेल. कारण, त्या व्यक्तीची कल्पनाशक्ती अफाट आहे आणि त्याची खरी गरज भारतीय ड्रेसिंग रुमला नाही तर, चित्रपटसृष्टीला आहे, असेही धोनी पुढे म्हणाला.
ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी नेटमध्ये सराव करताना धवनच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याने आपली आदल्या दिवशीची खेळी पुढे सुरू करण्यास इन्कार केला. म्हणून विराट कोहलीला अतिशय कमी वेळात क्रीझवर जाण्यास सांगण्यात आले. यावरून भारतीय ड्रेसिंग रुममध्ये अशांतता परसल्याचे वृत्त समोर आले होते.