भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापूर्वी भारताचा माजी कसोटीपटू आणि समालोचक व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी कोहली आणि स्मिथ यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय. कोहली आणि स्मिथ दोघांच्यामध्ये कधीच मैत्री होऊ शकत नाही, असे लक्ष्मण यांनी म्हटलं आहे. कोहली आणि स्मिथ दोघही आक्रमक आहेत. ते जिंकण्यासाठी मैदानात उतरतात. मैत्री करण्यासाठी ही मंडळी मैदानात उतरत नाहीत, त्यामुळे दोघांमध्ये कधीही मैत्री होऊ शकत नाही, असे मत लक्ष्मण यांनी व्यक्त केले.

विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ सध्याच्या युगातील चांगले फलंदाज आहेत. स्वत:ला सर्वश्रेष्ठ ठरवण्यासाठी दोघही मैदानात सर्वस्व पणाला लावतील, असे लक्ष्मण म्हणाले. आगामी मालिकेविषयी लक्ष्मण म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंवर दडपण असते. हे दडपण पेलणारा संघच मालिकेत आपली छाप सोडेल.  यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात कोहली आणि स्मिथ यांच्यात मैदानावर चांगलाच शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते. यामुळेच भारत दौऱ्यावर आलेल्या स्मिथने खिलाडूवृत्तीने खेळू, असे मालिकेपूर्वीच स्पष्ट केले. दोन्ही संघातील कर्णधार मैदानात कशा प्रकारे व्यूहरचना आखतात हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल.

ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात अध्यक्षयीय संघासमोर निर्धारीत ५० षटकात ३४७ धावा करुन भारताविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. या सामन्यात स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ट्रेविस हेड, मार्कस स्टोयनीस यांनी अर्धशतकी खेळी केली. हा सामना ऑस्ट्रेलियाने तब्बल १०३ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा हा फॉर्म पाहता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका रंगतदार होणार यात शंका नाही.