पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे, तर भारताच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहे.
मानधनाचा वाद विकोपाला गेल्यामुळे वेस्ट इंडिज संघ अर्धवट सोडून मायदेशी परतल्यामुळे आता श्रीलंकेचा संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने मंगळवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. धोनीच्या जागी यष्टिरक्षणासाठी बंगालच्या वृद्धिमान साहाने पुनरागमन केले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेप्रसंगी विश्रांती घेणारा आर. अश्विन फिरकीपटू कुलदीप नायरऐवजी संघात परतला आहे. याचप्रमाणे दुखापतग्रस्त मोहित शर्माची जागा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने घेतली आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलासुद्धा संघात स्थान देण्यात आलेले नाही.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धचे पाच एकदिवसीय सामने कटक, हैदराबाद, रांची, कोलकाता आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. दौऱ्याचा विस्तारित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली.
शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडेच भारताच्या सलामीची धुरा सोपवण्यात आली आहे, तर दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आले आहे.
मधल्या फळीची महत्त्वाची जबाबदारी कोहलीवर असेल, तर सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा आणि साहा हे अन्य फलंदाज असतील. बराच काळ धावांसाठी झगडणाऱ्या कोहलीला विंडीजविरुद्ध सूर गवसला आहे. धरमशाला येथील चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याने धडाकेबाज शतक झळकावले होते.
विंडीजविरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झालेला अनुभवी तेज गोलंदाज इशांत शर्मा एकही सामना खेळू शकला नव्हता. शर्मासह मोहम्मद शमी, उमेश यादव आणि वरुण आरोन यांचा भारताच्या वेगवान माऱ्यात समावेश असेल. याशिवाय अश्विन, जडेजा, अमित मिश्रा आणि युवा अक्षर पटेल फिरकी माऱ्याची जबाबदारी सांभाळतील.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, अमित मिश्रा, मुरली विजय, वरुण आरोन, अक्षर पटेल.

श्रीलंकेविरुद्धचा सराव सामना ब्रेबॉर्नवर
मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियमवर ३० ऑक्टोबरला पाहुण्या श्रीलंका संघाविरुद्धचा एकदिवसीय सराव सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व मनोज तिवारीकडे देण्यात आले आहे. मुंबईच्या रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीला या संघात स्थान देण्यात आले आहे.

भारत ‘अ’ संघ
मनोज तिवारी (कर्णधार), उन्मुक्त चंद, मनन व्होरा, करुण नायर, रोहित शर्मा, केदार जाधव, संजू सॅमसन, परवेझ रसूल, करण शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मनीष पांडे, कुलदीप पांडे.