डावखुरा फिरकीपटू अमित मिश्राने चार वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी घोषित करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात अनुभवी हरभजन सिंगनेही आपले स्थान टिकवले आहे.
बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात खेळलेला १४ जणांचा संघच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे. कोणतेही मोठे बदल करण्याचे निवड समितीने टाळले आहे, मात्र ३२ वर्षीय मिश्राला संघात स्थान दिले आहे. ऑगस्ट २०११मध्ये इंग्लंडविरुद्ध मिश्रा अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
डावखुरा फिरकीपटू कर्ण शर्माने दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली होती. युवा फलंदाज लोकेश राहुलने संघातील आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीच्या बैठकीला भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने हजेरी लावली होती. निवड समितीने गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह सध्या फॉर्मात असलेला रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्याचे टाळले आहे.
निवड समितीने रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग आणि मिश्रा या तीन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे. याचप्रमाणे इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि वरुण आरोन या वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. शिखर धवन आणि मुरली विजय सलामीला उतरतील, तर कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल मधल्या फळीत फलंदाजी करतील. १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांचा समावेश असून, वृद्धिमान साहा या एकमेव यष्टीरक्षकाला संघात स्थान दिले आहे.

कोहली ‘अ’ संघातर्फे खेळणार
नवी दिल्ली : भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धचा चार दिवसीय सामना खेळण्याचे ठरवले आहे. हा सामना २८ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये चेन्नईमध्ये होणार आहे. भारतीय ‘अ’ संघाचे कर्णधारपद चेतेश्वर पुजाराकडेच राहणार आहे.

भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हरभजन सिंग, आर. अश्विन, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा आणि वरुण आरोन.

कसोटी मालिकेचा कार्यक्रम
कसोटी     तारीख                               स्थळ
पहिली    १२ ते १६ ऑगस्ट                  गॅले
दुसरी    २० ते २४ ऑगस्ट                  कोलंबो
तिसरी    २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर      कोलंबो

रमण यांच्याविरोधात कारवाई नाही- ठाकूर
* लोढा समितीच्या अहवालानंतर राजस्थान रॉयल्सशी निगडित असलेल्या सुंदर रमण यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही जणांनी केली होती. पण, रमण यांच्याविरोधात लोढा समितीने निर्णय दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
*‘‘रमण यांच्याविरोधात कोणताही निर्णय झालेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांची चौकशी सुरू होती, तोपर्यंत आम्ही थांबलो होतो. आता लोढा समितीचा निर्णय आला असून त्यामध्ये रमण यांचा उल्लेख नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रमण हे बीसीसीआयचे कर्मचारी असून ते निर्णय घेऊ शकत नाहीत,’’ असे ठाकूर म्हणाले.