एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला ५-० अशी धूळ चारल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार हात करण्यासाठी विराट ब्रिगेड सज्ज झाली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवून एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी भरारी घेण्याची संधी भारतीय संघाला आहे. सध्याच्या घडीला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. मात्र एकदिवसीय आणि टी-२० मध्ये भारतीय संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

एकदिवसीय क्रमवारीत ११९ गुणांसह दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि भारत ११७ गुणासंह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने ५-० असे निर्विवाद यश मिळवले तर भारताच्या खात्यात १२२ गुण जमा होतील आणि दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून भारत पहिल्या स्थानावर झेप घेईल. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ असे पराभूत केले तरी भारतीय संघाची अव्वलस्थानी जाण्याचा मार्ग सुकर होईल.

ज्याप्रमाणे भारतीय संघाला संधी आहे. तसेच समीकरण ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत देखील आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-१ ने खिशात घातली तर त्यांच्या खात्यात १२० गुण होतील. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेपेक्षा एक गुण अधिक मिळवत ऑस्ट्रेलिया एकदिवसीयमध्ये अव्वल ठरेल. भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियासाठी या मालिकेत निर्विवाद यश मिळवणे सोपे नाही. कर्णधार विराट कोहलीसह, सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे कामगिरीतील सातत्य कायम राखत विराट ब्रिगेडला स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघाला चारीमुंड्या चीत करुन एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची सुवर्ण संधी आहे, असेच म्हणावे लागेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेबरपासून पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. कसोटी दौऱ्यावर भारताने दिलेल्या पराभवाची परतफेड करण्यात स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ प्रयत्नशील असेल. त्यांना कितपत यश मिळणार हे येणारा काळच ठरवेल.