क्रिकेटच्या मैदानात विस्फोटक फलंदाजीने गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणाऱ्या वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावरही विक्रमी कामगिरी केलीय. हजरजबाबी ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सेहवागच्या ट्विटर फॉलोअर्सच्या आकड्याने १ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. वीरूने याचं सेलिब्रेशन देखील आपल्या अनोख्या अंदाजात केलं आहे. वीरूने भांगड्याच्या अंदाजात १० मिलियन फॉलोअर्सचा आकडा गाठल्याचा आनंद व्हिडिओतून व्यक्त केला. वीरूने आपल्या चाहत्यांचे याबाबत आभार देखील व्यक्त केले.

मी आज ‘ट्विटरकरोडपती’ झालोय असं ट्विट वीरूने केलं. #twittercrorepati हा हॅशटॅग वीरूने आपल्या ट्विटमध्ये नमूद केलाय. चाहत्यांनीही वीरूचं अभिनंदन केलं. वीरूचा ट्विटरकरोडपती हा हॅशटॅग आता ट्विटर ट्रेंडमध्ये येईल असंही एका चाहत्यानं वीरूला म्हटलं आहे. क्रिकेटच्या मैदानात जसे जलदगतीने फलंदाजीसाठी तुझी ओळख होती तशीच ओळख तू ट्विटरवरही कायम ठेवतोयस, त्याबद्दल खरंच कौतुक, असंही एका ट्विटरकराने केलं आहे.

वीरेंद्र सेहवागचे ट्विट्स नेहमी दखलपात्र असतात. क्रिकेटपटूंचा वाढदिवस असो किंवा एखाद्या घटनेवर व्यक्त केलेलं जळजळीत भाष्य, वीरूच्या ट्विटची दिग्गजांसहीत माध्यमांकडूनही नेहमी दखल घेतली जाते. वीरूच्या काही ट्विट्सने वाद देखील निर्माण झाले होते.