दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी गुरमेहर कौर हिच्या फेसबुक पोस्टवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केलेल्या ट्विटमुळे तो देखील या प्रकरणात गोवला गेला आहे. मात्र, आपण केलेल्या ट्विटचा गुरमेहर कौर प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण सेहवागने दिले आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले. मी केलेले ट्विट गुरमेहरला उद्देशून केले नव्हते. मी अगदी प्रांजळ मत व्यक्त केले होते. त्यामागे कोणावरही टीका करण्याचा उद्देश नव्हता. मात्र, काहींनी माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ काढला, असे सेहवागने ‘इंडिया टुडे’ला सांगितले.

गुरमेहर कौर हिने काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला लक्ष्य केले होते. मी दिल्ली विद्यापीठात शिकते आणि मी अभाविपला घाबरत नाही, असा संदेश देणारी एक फेसबुक पोस्ट गुरमेहर कौरने टाकली होती. त्यावर गुरमेहर हिला बलात्काराच्या धमक्या आल्याचेही धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. गुरमेहरच्या वक्तव्याची सोशल मीडियावर काहींनी खिल्ली देखील उडवली होती. दरम्यान, विरेंद्र सेहवागने “मी, दोन त्रिशतकं ठोकलीच नाही, ती तर माझ्या बॅटने ठोकली”, असे उपहासात्मक ट्विट केले होते. सेहवागच्या या ट्विटचा थेट गुरमेहर कौर प्रकरणाशी संबंध जोडला गेला. ‘भारत जैसी जगह नही’ या हॅशटॅगसह सेहवागने ‘बॅट (बात) में है दम!’ या मथळ्यासह फोटो ट्विट केला होता. सेहवागच्या ट्विटचा रोख गुरमोहर कौर प्रकरणाकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आणि सेहवाग देखील टीकेचे केंद्रस्थान बनला. मात्र, सेहवागने आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देऊन या प्रकरणातून हात झटकले आहेत.