साबरमतीच्या एका काठावर नीरव शांतता होती, तर दुसऱ्या काठावर म्हणजेच सरदार वल्लभभाई स्टेडियमवर मात्र जल्लोषाला उधाण आले होते. हा जल्लोष होता तो वीरेंद्र सेहवागच्या दिवाळी बंपर धमाक्याचा.. त्याच्या फटक्यांचा.. आणि इंग्लंडच्या गोलंदाजांच्या धुलाईचा.. देशभरातील लोकांनी दिवाळी साजरी केल्यानंतर वीरूने आपले खास फटाके पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच वाजवायला सुरुवात केली आणि प्रेक्षकांनी त्याचा पैसा वसूल आनंद लुटला. सेहवागचे तडाखेबंद शतक, त्याला गौतम गंभीरची मिळालेली सुरेख साथ आणि चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ९८ धावांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३२३ अशी मजल मारली. सेहवाग बाद झाल्यावर पुजाराचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला जास्त काळ फलंदाजी करता न आल्याने भारताला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वान याने भारताच्या फलंदाजांची पहिल्याच दिवशी चांगली परीक्षा घेतली आणि चारही बळी मिळवण्याची किमया साधली.
नाणेफेक जिंकल्यावर फिरकीला पोषक वाटणाऱ्या आणि चेंडू कमी उसळणाऱ्या खेळपट्टीवर महेंद्रसिंग धोनीने फलंदाजीचा निर्णय घेतला व सेहवागने हा निर्णय सार्थकी लावला. पहिली चार षटके त्याने सावध खेळून काढली, पण जेम्स अँडरसनला पाचव्या षटकात ‘लॉँग लेग’ला सामन्याचा पहिला चौकार लगावला. त्यानंतरच्या सातव्या षटकात अँडरसनलाच तीन चौकार ठोकत त्याची गोलंदाजी बंद करायला लावली. नेहमीच अंदाधुंद फलंदाजी करणारा सेहवाग गुरुवारी संयमी दिसत होता.
नोव्हेंबर २०१० पासून गेल्या ३० डावांमध्ये सेहवागला एकही शतक झळकावता आले नव्हते आणि तेच डोक्यात ठेवून त्याने ही खेळी साकारली. गंभीरबरोबर एकेरी-दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवत १८ व्या षटकात त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरच्याच १९ व्या षटकात टीम ब्रेसननला २ चौकार आणि ‘लॉँग ऑन’ला खणखणीत षटकार लगावत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. उपाहाराच्या वेळी सेहवागने ६५ चेंडूंत ७८ धावांची खेळी साकारल्यामुळे भारताला बिनबाद १२० अशी मजल मारता आली.
उपाहारानंतरच्याच २९ व्या षटकात अँडरसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक मॅट प्रायरने सेहवागला जीवदान दिले. त्यानंतरच्याच तिसाव्या षटकात पुन्हा एकदा प्रायरने स्वानच्या दुसऱ्या चेंडूवर गंभीरला यष्टिचीत करण्याची संधी सोडली, पण या जीवदानाचा फायदा गंभीरला घेता आला नाही. याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर चेंडू अपेक्षेपेक्षा खाली राहिला आणि गंभीर त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. गौतमने बाद होण्यापूर्वी गंभीर खेळी साकारत १११ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या, तर सेहवागबरोबर १३४ धावांची सलामीही दिली. गंभीर बाद झाल्यावर सेहवाग आणि पुजारा यांनी खेळपट्टीचा बदललेला पोत पाहत सावध पवित्रा घेतला. ४० व्या षटकात स्वानला ‘मिड ऑन’ला खणखणीत चौकार ठोकत सेहवागने कारकीर्दीतील २३ व्या शतकाला गवसणी घातली. शतकानंतर सेहवागने संयम गमावला नाही, पण पुजाराला मात्र या वेळी सेहवागचा गुण नाही, पण वाण लागला. जवळपास प्रत्येक षटकात पुजाराने चौकार ठोकत ६७ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. पुजाराचे शतक झाल्यावर काही वेळातच स्वानला ‘स्वीप’ मारण्याच्या नादात सेहवाग त्रिफळाचीत झाला, पण बाद होण्यापूर्वी सेहवागने आपले काम चोख बजावले होते. त्याने ११७ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११७ धावांची खेळी साकारली.
सेहवाग बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो धावांच्या दुष्काळात असलेला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (१३). स्वानच्या फिरकीला सचिन समर्थपणे सामोरा जाऊन मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते, पण स्वानला मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने समित पटेलच्या हातात आपली विकेट बहाल केली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीला (१९) स्वानने अप्रतिमरीत्या त्रिफळाचीत केले.
स्वानपुढे आता भारताचा डाव घसरणार असे वाटत असतानाच पुजाराने खेळपट्टीवर नांगर टाकला आणि त्याला संघात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगने (खेळत आहे २४) चांगली साथ दिली. या दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर पुजाराने चौकार ठोकत दिवसाचा शेवटही गोड केला. पुजाराने सुरुवातीला आक्रमक आणि त्यानंतर संयमी खेळाचा सुंदर मिलाप आपल्या खेळीतून दाखवला. पुजाराने १८१ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद ९८ धावांची खेळी साकारली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.
इंग्लंडच्या स्वानचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टीकडून मदत मिळत असताना त्याने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला. या दिवसाचे चारही बळी मिळवत त्याने संघाला दिलासा दिला.    
ट्रॉटची अखिलाडूवृत्ती
अहमदाबाद : इंग्लंडचा खेळाडू जोनाथन ट्रॉटने आपल्या अखिलाडूवृत्तीचे दर्शन पहिल्याच दिवशी घडवले. स्वानच्या गोलंदाजीवर कोहलीने मारलेला फटका ट्रॉटच्या हातात विसावला. मात्र हा चेंडू जमिनीवर पडून ट्रॉटच्या कोपऱ्याला लागला. यानंतर चेंडू जमिनीवर पडला आणि ट्रॉटने चपळाई दाखवत चेंडू स्वच्छपणे टिपल्याचे भासवत विकेटसाठी अपील केले. हा झेल स्पष्टपणे टिपला गेला आहे की नाही हे ठरविण्यासाठी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. टेलिव्हिजन रिप्लेमध्ये मात्र ट्रॉटचे खोटे अपील उघड झाले आणि पंचांनी कोहलीला नाबाद ठरवले. खिलाडूवृत्तीला जागत ट्रॉटने चेंडू जमिनीवर पडल्याचे पंचांना सांगायला हवे होते, परंतु त्याने तसे केले नाही.

मी माझ्या फलंदाजीचे व्हिडीओ बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत पाहत होतो. त्यामधून मला कळलं की, जेव्हा मी पहिली दहा षटके सावधपणे खेळतो तेव्हा मी शतक झळकावतो आणि तेच मी सामन्याच्या पहिल्या दिवशी करण्याचा  प्रयत्न केला. दीड-दोन वर्षांनंतर झालेल्या शतकाने मी नक्कीच आनंदी आहे. माझा माझ्या खेळावर पूर्णपणे विश्वास आहे. गंभीरने चांगली सुरुवात केली, पुजाराही चांगला खेळला, तो त्याचे शतक शुक्रवारी नक्कीच पूर्ण करेल. खेळपट्टी संथ असून त्यावर फटकेबाजी करणे सोपे नक्कीच नाही. मोठी धावसंख्या रचून इंग्लंडचे स्वस्तात २० बळी मिळवण्याचेच आमचे ध्येय असेल.
वीरेंद्र सेहवाग
भारताचा सलामीवीर

 धावफलक
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर त्रि. गो. स्वान ४५, वीरेंद्र सेहवाग त्रि.गो. स्वान ११७, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ९८, सचिन तेंडुलकर झे. पटेल गो. स्वान १३, विराट कोहली त्रि. गो. स्वान १९, युवराज सिंग खेळत आहे २४, अवांतर (बाइज १, लेग बाइज ५, नो बॉल १) ७,
एकूण ९० षटकांत ४ बाद ३२३. बाद क्रम : १-१३४, २-२२४, ३-२५०, ४-२८३. गोलंदाजी : जेम्स अँडरसन १७-३-६६-०, स्टुअर्ट ब्रॉड १७-१-७१-०, टीम ब्रेसनन १०-०-५६-०, ग्रॅमी स्वान ३२-५-८५-४, समित पटेल १४-२-३९-०.