क्रिकेटच्या मैदानातील फटकेबाजीनंतर ट्विटरवर शाब्दिक फटकेबाजी करून अनेकांची ‘धुलाई’ करणारा विरेंद्र सेहवाग नेहमीच चर्चेत असतो. पण हिंदी दिनानिमित्त त्याने केलेल्या एका ट्विटवर नेटिझन्सने ‘स्माईली’ देत त्याची नकळत ‘फिरकी’ घेतली.

सेहवागने हिंदी दिनानिमित्त एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने छोटीशी चूक केली. ‘हिन्दि हमारे राष्ट्र की अभिव्यक्ति का सरलतम स्त्रोत है! जो बात हिंदी में है वो किसी और में नही!, असे त्याचे ट्विट आहे. तसेच मी भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात हिंदीमध्ये समालोचन करणार असल्याचा उल्लेखही केला आहे. पण ट्विटमधून हिंदी भाषेविषयी आदर व्यक्त करताना ‘हिंदी’ हा शब्दच त्याने चुकीचा लिहिला आहे. एकाच ट्विटमध्ये त्याने सुरुवातीला ‘हिन्दि’ आणि दुसऱ्या ओळीत ‘हिंदी’ असे लिहिले आहे. अर्थात व्याकरणातील चूक लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा ट्विट करुन ती सुधारली. आधीचे ट्विटही त्याने डिलिट केले नाही. चूक सुधारली असली तरी ती नेटिझन्सच्या नजरेतून चुकली नाही. ट्विटरवर शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या सेहवागच्या या ट्विटवर नेटिझन्स मात्र हळूच हसला. क्रिकेटच्या मैदानातील त्याचे बहारदार फटके सर्वांचे लक्ष वेधत होते.

तसेच ट्विटरवरील ‘शाब्दिक फटकारे’ नेटिझन्सला आकर्षित करतात. कधी-कधी त्याचा एखादा ट्विट नेटिझन्सना विचार करण्यास भाग पाडतो. क्रिकेटरचा वाढदिवस असो अथवा प्रतिस्पर्धी खेळाडूची त्याने ट्विटरवर घेतलेली ‘शाळा’ असो तो आपल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्याच्या ट्विटवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटताना दिसतात. पण आज एका ट्विटवरून तो स्वतःच नेटिझन्सच्या ‘फिरकी’त अडकला.