ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलिप ह्य़ुजेसच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने उसळत्या चेंडूंवर बंदी आणण्याचा विचार करू नये. उसळत्या चेंडूंवर बंदी घातल्यानंतर क्रिकेटमधील रंगतच निघून जाईल, असे मत भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले.
‘‘पूलचा फटका मारताना चेंडू डोक्यावर आदळला आणि ह्य़ुजेस मरण पावला, ही घटना दुर्दैवी आहे. पण हा क्रिकेट खेळाचाच एक भाग आहे. कोणत्याही खेळात दुखापती किंवा अशाप्रकारच्या घटना घडू शकतात. उसळत्या चेंडूवर फटकेबाजी करायची की नाही, हा फलंदाजाचा निर्णय असतो.
अनेक वेळा उसळत्या चेंडूंनी माझ्या हेल्मेटचा वेध घेतला आहे. उसळते चेंडू क्रिकेटमधून हद्दपार केल्यास, खेळातील मजा निघून जाईल. त्यानंतर क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ म्हणून ओळखला जाईल. उसळते चेंडू हे वेगवान गोलंदाजांचे प्रमुख अस्त्र मानले जाते. आयसीसी त्यावर बंदी आणेल, असे मला वाटत नाही,’’ असे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या करंडक अनावरणप्रसंगी वीरेंद्र सेहवागने सांगितले.
‘विश्वचषकाच्या संभाव्य यादीत माझे नाव असेल’
मुंबई : वीरेंद्र सेहवाग जवळपास दोन वर्षांपासून भारतीय संघात नसला, तरी पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या ३० जणांच्या संभाव्य यादीत नाव असेल, अशी आशा त्याला वाटत आहे. ‘‘विश्वचषक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करावे, ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. माझीही तशीच इच्छा असून या विश्वचषकात मी खेळेन, अशी आशा आहे. २०१५चा विश्वचषक जिंकण्याची क्षमता भारतीय संघात आहे. भारतीय संघ बलाढय़ असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी चांगली होत आहे,’’ असे सेहवागने सांगितले. तो म्हणाला, ‘‘क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया हे उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात होतोय, ही चांगली गोष्ट आहे. वेगवान खेळपट्टय़ांवर चेंडू बॅटवर नीट येत असतो. या वातावरणात फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनाही खेळाचा आनंद लुटण्याची संधी मिळते. ’’