मैदानात धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे मनोरंजन केलेल्या विरेंद्र सेहवागने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरी सोशल मीडियावर ‘वीरू’ची जोरदार बॅटींग सुरू आहे. सेहवाग गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कल्पक ट्विट्समुळे चर्चेत असतो. कॉमेंट्री बॉक्समध्येही सेहवागने आपली वेगळी छाप पाडली आहे. वीरूने केलेल्या हजरजबाबी ट्विटसने आजवर अनेक मान्यवरांनी दखल घेतली. भारतीय क्रिकेटपटूंना सेहवाग आपल्या ट्विटर अकाऊंटवर न विसरता वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तेही हटके अंदाजात. क्रिकेटपटूंना आपल्या वेगळ्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची वीरूची पद्धत जणू आता त्याचा कॉपीराईट ठरू लागली आहे. सेहवागने आता भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या.

वाचा: विरेंद्र सेहवागचे कॉमेंट्रीमधील विनोदी षटकार

शिखर धवन याला भारतीय संघाचा ‘गब्बर’ म्हणून ओखळले जाते. शिखरचा आज ३१ वा वाढदिवस आहे. मग शिखरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेगवागने त्याला शुभेच्छा दिल्या. सेहवाग ट्विटरवर म्हणाला की, ‘शिखर तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण तू फलंदाजीला मैदानात येण्याआधी निदान दोन तास आधीपासूनच ड्रेसिंग रुममध्ये भूमीपूजन करत जा आणि मैदानात आल्यानंतर नागीन डान्स कर’
सेहवागच्या या ट्विटने नक्कीच काहींच्या डोक्याला झिणझिण्या आल्या असतील, खरंतर सेहवाग कॉमेंट्री करतेवेळी एखादा फलंदाज मैदानात येताच क्षणी बाद होऊन माघारी परतल्यानंतर, हा खेळाडू फक्त भूमीपूजन करण्यासाठी मैदानात येतो, अशी उपमा देतो. तर भारतात आपला आनंद व्यक्त करण्यासाठी नागीन डान्स खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे शिखर तू मैदानात येण्याआधीच खूप सराव करून येत जा आणि मैदानात पुढचे दोन ते तीन तास सर्वांचे मनोरंजन कर, असे सेहवागला सुचवायचे आहे.

वाचा: मोहम्मद कैफला सेहवागकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा