आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघात युवराजसिंग व वीरेंद्र सेहवाग यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे असे भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितले.
विश्वचषक स्पर्धा आता जवळ आली आहे आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आपल्या संघात फारसा बदल करण्याची शक्यता कमी आहे असे सांगून गांगुली म्हणाले, युवी व वीरू हे दोघेही सामना जिंकून देणारे खेळाडू मानले जात असले तरी आता त्यांच्याकडे तशी क्षमता राहिलेली नाही. त्यातही आता त्यांच्या जागी असलेले युवा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत. तसेच संघाच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंमध्येही अव्वल कामगिरी करण्याची क्षमता आहे. विराट कोहली व सुरेश रैना हे आता सामना जिंकून देणारे खेळाडू म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर चमक दाखवून देण्याची क्षमता असलेले गोलंदाज ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेकडे आहेत. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याची त्यांना चांगली संधी आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे.
हे सामने भारतीय खेळाडूंसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. त्याचा फायदा घेत भारतीय खेळाडूंनी विश्वचषकासाठी भक्कम तयारी केली पाहिजे, असेही गांगुली यांनी सांगितले.