फ्रान्सच्या व्हॅचिएर-लॅग्रेव्हेचा विजय

भारताच्या विश्वनाथन आनंदला लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेत उल्लेखनीय कामगिरी करण्यात पुन्हा एकदा अपयश आले. सातव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिमे व्हॅचिएर-लॅग्रेव्हेने विजय मिळवून आनंदला जेतेपदाच्या शर्यतीतून दूर लोटले. गेल्या चार लढतींतील आनंदचा हा तिसरा़, तर सलग दुसरा पराभव आहे. शुक्रवारी रशियाचा ग्रँडमास्टर अलेक्झांडर ग्रिस्चुकने त्याला पराभूत केले होते.
सातव्या फेरीअखेरीस आनंदच्या खात्यात २.५ गुणच जमा झाले आहेत. लॅग्रेव्हेने (४.५ गुण) सलग दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले. सातव्या फेरीत अनेक निर्णायक निकाल पाहायला मिळाले. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला अखेरीस पहिल्या विजयाची चव चाखायला मिळाली. नॉर्वेच्या कार्लसनने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरावर विजय मिळवला, तर अर्मेनियाच्या लेव्हॉन अ‍ॅरोनियनने बल्गेरियाच्या व्हॅसेलीन टोपालोव्हचा झटपट पराभव केला. दरम्यान, हॉलंडच्या अनिश गिरीला अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाने, तर इंग्लंडच्या मिचेल अ‍ॅडम्सला ग्रिस्चुकने बरोबरीत रोखले.
आनंदला व्हॅचिएर-लॅग्रेव्हेकडून नॅजडॉर्फ सिसिलियन पद्धतीने डावाची सुरुवात अपेक्षित होती आणि त्याने मध्यंतरापर्यंत सामन्यात पकड घेतली होती. मात्र, व्हॅचिएर-लॅग्रेव्हेने आक्रमक चाली करून आंनदवर दडपण निर्माण केला. त्यामुळे आनंदने आपल्या राणीला वाचवण्यासाठी दोन प्यांदाचा बळी देण्याचा निर्णय घेतला. आनंदची ही भरपाई कामी आली नाही आणि व्हॅचिएर-लॅग्रेव्हने चतुर खेळ करून विजय मिळवला. ‘‘माझ्याकडून चांगला खेळ झाला, असे वाटतेय. हा विजय माझ्यासाठी बक्षीसच आहे,’’ असे मत व्हॅचिएर-लॅग्रेव्हने व्यक्त केले.