बंगळुरू : अपंग व्यक्तींना रोजचे जीवन जगताना काय यातना भोगाव्या लागतात याचा दाहक अनुभव समोर आला आहे. डोळ्यांनी अंशत: अधू असलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला न्याहरीदरम्यान तहान लागली. मिनरल वॉटरसदृश दिसणाऱ्या बाटलीतील द्रव्य त्याने प्यायले. मात्र हाय रे दैवा.. ती बाटली मिनरल वॉटर नव्हे तर फिनेलची होती.. या दुर्दैवी घटनेनंतर या क्रिकेटपटूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधांच्या क्रिकेट विश्वचषकाच्या निमित्ताने पाकिस्तानचा संघ भारतात आला आहे. या संघातील २८ वर्षीय झेशान अब्बासीच्या बाबतीत हा करुण प्रसंग घडला. ही घटना कळताच आम्ही तात्काळ झेशानला रुग्णालयात दाखल केले, त्याची प्रकृती आता ठीक असून त्याला निरीक्षणासाठी रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे अंध क्रिकेट संघटनेच्या संयोजन सचिव महंटेश यांनी सांगितले. अब्बासीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी एन्डोस्कोपी करण्यात आली असून, सर्व चाचण्यांच्या अहवालामध्ये त्याला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला सर्वसाधारण विभागात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून जाण्याची मुभा मिळेल, असे अब्बासी यांनी सांगितले. हॉटेल व्यवस्थापनाने लेखी क्षमा मागितली आहे. मात्र असा धक्कादायक प्रकार घडला कसा? याबाबत हॉटेल व्यवस्थापनाला तपास करायला सांगितल्याचे अंधांसाठीच्या अखिल भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष एस. पी. नागेश यांनी सांगितले.