माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने ताल चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अझरबैजानच्या शाख्रीयर मामेद्यारोववर मात केली आणि दुसऱ्या फेरीत संयुक्त आघाडी घेतली.

आनंदने अनिष गिरी (नेदरलँड) व इयान नेपोम्नियाची (रशिया) यांच्यासमवेत आघाडी मिळविली. त्यांचा प्रत्येकी दीड गुण झाला आहे. अनिषने बोरिस गेल्फंडवर सनसनाटी विजय मिळविला, तर इयानने आपलाच सहकारी पीटर स्विडलरला बरोबरीत रोखले. एवगेनी तोमाशेवस्की याने लिवॉन आरोनियन या बलाढय़ खेळाडूला बरोबरीत ठेवून अनपेक्षित निकाल नोंदवला. चीनच्या ली चाओने अव्वल दर्जाचा खेळाडू व्लादिमीर क्रामनिक याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवीत आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला. चाओ, क्रामनिक, आरोनियन व स्विडलर यांचा प्रत्येकी एक गुण झाला आहे.

आनंद व मामेद्यारोव यांच्यातील डाव आकर्षक ठरला. मामेद्यारोवने आनंदला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डावपेचांना आनंदने उत्कृष्ट बचाव करीत चोख उत्तर दिले. आक्रमणासाठी चांगली व्यूहरचना मिळवण्यासाठी मामेद्यारोव याने एक मोहराचा बळीही दिला, मात्र आनंदच्या खेळावर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. आनंदने कल्पकतेने डावपेच करीत ५२व्या चालीस विजय मिळवला.

अनिषने किंग्ज इंडियन डिफेन्सच्या तंत्राचा उपयोग करीत गेल्फंड याला हरविले. गेल्फंड याने सुरुवातीला चाली करण्यास खूप वेळ लावला. त्यामुळेच त्याच्यावर वेळेत चाली करण्याचे दडपण आले. या दडपणाखाली त्याच्याकडून नकळत चुका होत गेल्या व त्याचा फायदा अनिषला मिळाला. क्रामनिक याच्याविरुद्ध चाओने सुरेख खेळाचा प्रत्यय घडवला व त्याला डाव बरोबरीत ठेवण्यास भाग पाडले.

 

राकेश व निखिल यांना विजेतेपदाची संधी

महाराष्ट्राचा राकेश कुलकर्णीने अग्रमानांकित स्वप्निल धोपाडेवर मात केली आणि श्रीमहेश्वरानंद सरस्वती स्मृती अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदवला. त्याने पी. श्याम निखिलच्या सोबत आठव्या फेरीअखेर प्रत्येकी सात गुण घेत विजेतेपदाची संधी निर्माण केली.

रेल्वेचा खेळाडू श्याम निखिलने तामिळनाडूच्या एस.प्रसन्नवर शानदार विजय मिळविला. आठव्या फेरीअखेर धोपाडे, आर.रामनाथ भुवनेश, पी.सरावना कृष्णन व एम.कुणाल यांच्याबरोबरच हर्षित राजा, शशिकांत कुतवळ, पवन दोडेजा या महाराष्ट्रीय खेळाडूंनीही प्रत्येकी साडेसहा गुण मिळवत आपले आव्हान राखले. सहाव्या फेरीत ग्रॅण्डमास्टर आर.आर.लक्ष्मणवर मात करणाऱ्या मिताली पाटीलला हर्षित राजाने पराभूत केले. कुतवळने पुण्याच्या अमृता मोकलला पराभूत केले.

 

जयराम आणि साईप्रणीत दुसऱ्या फेरीत

सेऊल : भारताच्या अजय जयराम व बी. साईप्रणीत यांनी कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. मात्र त्यांचे सहकारी किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, एच. एस. प्रणॉय व तन्वी लाड यांना पराभवाचा धक्का बसला.

जयरामने २९वा वाढदिवस साजरा करताना स्थानिक खेळाडू जेओन हेयोक जिनचे आव्हान २३-२१, २१-१८ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर संपुष्टात आणले. साईप्रणीतने चीन तैपेईचा खेळाडू हेसु जेनहोवर २१-१३, १२-२१, २१-१५ अशी मात केली. हाँगकाँगच्या वोंगकिंग किव्हिसेंटने श्रीकांतला २१-१०, २२-२४, २१-१७ असे नमवले. राष्ट्रकुल विजेता कश्यपने चौथा मानांकित खेळाडू तियान होवेईला चिवट लढत दिली. मात्र हा सामना त्याने २०-२२, २१-१०, २१-१३ असा जिंकून दुसरी फेरी गाठली. स्वीस खुल्या स्पध्रेतील विजेता प्रणॉयला चीन तैपेईच्या वांग त्झुवेई याच्याकडून २३-२१, १७-२१, १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. डेन्मार्कच्या अ‍ॅना थिमडन्सनने तन्वीला २१-१८, १३-२१, २१-१८ असे नमवले.

 

अदिती घुमटकरला सुवर्णपदक

रांची : महाराष्ट्राच्या अदिती घुमटकरने रांची येथे सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अदितीने १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात २९.१४ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. हरयाणाच्या शिवानी कटारियाने रौप्य तर महाराष्ट्राच्यात रायन सालढणाने कांस्यपदक पटकावले.

निमीश मुळ्ये, अदिती, अवंतिका चव्हाण आणि विराज प्रभू यांच्या संघाने १ मिनिट आणि ४२.९१ सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. महाराष्ट्राने महिला गटात अजिंक्यपदावर नाव कोरले. गुणतालिकेत ८ सुवर्ण, ९ रौप्य, ६ कांस्य अशा २३ पदकांसह महाराष्ट्र गुणतालिकेत द्वितीय स्थानी आहे.

 

मुंबई-ठाणे यांच्यात आज उपांत्य लढत

पुणे : साखळी गटातील रंगतदार लढतीनंतर आता महाकबड्डी लीगमधील उपांत्य फेरीच्या लढतींबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. उपांत्य फेरीच्या लढतींना गुरुवारी येथे सुरुवात होत आहे.

पहिल्या लढतीत पिंपरी-चिंचवड चॅलेंजर्स संघाला रायगड डायनामोज संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. महिलांच्या लढतीनंतर ठाणे टायगर्स व मुंबई महाकाळ हा पुरुष गटाचा सामना होणार आहे. रत्नागिरी रेडर्स व मुंबई महाकाळ ही महिलांची लढत होईल. त्यानंतर रायगड डायनामोज व पुणे पँथर्स हा पुरुष गटातील सामना होणार आहे.