पाच वेळा विश्वविजेतेपदावर कब्जा करणाऱ्या विश्वनाथन आनंदने झुरिच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्जेय कर्जाकिनविरुद्धची लढत बरोबरीत राखत क्लासिक प्रकारात अव्वल स्थान मिळवले. सुधारित नियमावलीनुसार सामना जिंकण्यासाठी दोन गुण, तर बरोबरीसाठी एक गुण देण्यात येतो. आनंदने दोन लढती जिंकल्या तर अन्य तीन बरोबरीत सोडवल्या. ग्रेन्के क्लासिक स्पर्धेतील मोठय़ा पराभवानंतर आनंदने या स्पर्धेद्वारे दिमाखदार पुनरागमन केले आहे.
आनंदच्या तुलनेत एका गुणाने मागे असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनिआनविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. रशियाच्या व्लादिमीर क्रामनिक आणि फॅबिआनो कारूना यांच्यातील लढतही बरोबरीतच संपली. क्रामनिकने तिसरे स्थान मिळवले. आता या बुद्धिबळपटूंमध्येच रॅपिड प्रकारात मुकाबला रंगणार आहे.