माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा सिंक्वेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पध्रेतील विजयाचा शोध अद्याप जारी आहे. पाचव्या फेरीत त्याने फ्रान्सच्या मॅक्झिमे व्हॅचिअर-लॅग्रेव्हला बरोबरीत रोखले. पहिल्या दोन फेऱ्यांमधील धक्कादायक पराभवांनंतर सलग तीन सामने बरोबरीत सोडवणाऱ्या आनंदच्या खात्यावर पाचव्या फेरीअंती फक्त  दीड गुण जमा आहेत. या स्पध्रेच्या चार फेऱ्या अजून बाकी असून, सुरुवातीचे अपयश भरून काढण्यासाठी आनंदला मोठय़ा विजयांची आवश्यकता आहे.
विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने आक्रमक खेळाचा प्रत्यय घडवताना अमेरिकेच्या वेसली सो याला पराभूत करण्याची किमया साधली. आता कार्लसनसोबत अर्मेनियाचा लिव्हॉन अरोनियन प्रत्येकी साडेतीन गुणांसह आघाडीवर आहेत. परंतु गुरुवापर्यंत आघाडीवर असणाऱ्या बल्गेरियाच्या व्हेसेलिन तोपालोव्हला स्पध्रेतील पहिल्यावहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. गतविजेत्या आणि स्थानिक खेळाडू फॅबिआनो कारुआनाने त्याला पराभूत केले.
अरोनियमने रशियाच्या अ‍ॅलेक्झांडार ग्रिस्चूकला बरोबरीत रोखले, तर अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने नेदरलॅण्ड्सच्या अनिश गिरीसोबत बरोबरीत समाधान मानले. सध्या तोपालोव्ह आणि गिरी प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर नाकामुरा आणि व्हॅचिअर-लॅग्रेव्ह हे दोघे जण संयुक्तपणे अध्र्या गुणांनी पिछाडीवर आहेत. कारुआना आणि ग्रिश्चूक प्रत्येकी दोन गुणांसह सातव्या स्थानावर आहेत, तर आनंद आणि वेस्ली सो प्रत्येकी दीड गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहेत.
आनंदने व्हॅचिअर-लॅग्रेव्हविरुद्ध खेळताना आश्चर्यकारकपणे सिसिलियन नॅजडोर्फ पद्धतीचा वापर केला. व्हॅचिअर-लॅग्रेव्हने आनंदच्या चालींना आत्मविश्वासाने प्रत्युत्तर दिले. अखेरीस ४२च्या चालीनंतर दोघांनी बरोबरी मान्य केली. कार्लसनने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना इंग्लिश आक्रमण पद्धतीचा वापर केला. कार्लसनच्या तंत्रशुद्ध खेळापुढे वेस्लीकडे उत्तर नव्हते. त्यामुळे ५६व्या चालीला त्याने पराभव मान्य केला.