भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ स्पर्धेत संयुक्त पाचवे स्थान मिळवले आहे.
विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने एकाच वेळी फिडे विश्वविजेतेपद, जलद व ब्लिट्झ अशा तीनही स्वरूपात अजिंक्यपद मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. आनंदने ब्लिट्झ स्पर्धेतील पहिल्या दिवशी अकरा डावांमध्ये साडेसात गुण मिळविले होते. शनिवारी त्याने दहा डावांमध्ये सहा गुणांची कमाई केली. कार्लसन याने ब्लिट्झ स्पर्धेत १७ गुण मिळवीत उल्लेखनीय कामगिरी केली. रशियाचा इयान नेपोम्निची व अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांनी संयुक्तपणे दुसरे स्थान घेतले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. आनंदला अझरबैजानच्या शाख्रीयर मामेद्यारोव्ह व रौफ मामेदोव्ह तसेच अर्मेनियाचा लिव्हॉन आरोनियन यांच्यासमवेत संयुक्त पाचवे स्थान घेतले. आनंदने शेवटच्या दिवशी आपला सहकारी पी. हरिकृष्ण याला हरविले. पाठोपाठ त्याने कार्लसनला बरोबरीत रोखले. जर्मनीच्या जॉर्ज मेईर याच्यावर त्याने स्पृहणीय विजय मिळविला. मात्र त्यानंतर त्याला नेपोम्निची, नाकामुरा व लिएम यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पदक मिळविण्याच्या आनंदच्या आशा धुळीस मिळाल्या. शेवटच्या डावात त्याने अझरबैजानच्या तैमूर रादजाबोव्हवर मात करीत पाचवे स्थान घेतले.