निवृत्ती व विश्रांती हे दोन्ही शब्द माहीत नसलेला माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद हा विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहे. त्याच दृष्टीने सेंट लुईस (अमेरिका) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी होणार आहे.

४७ वर्षीय आनंदसाठी यंदाचे वर्ष अपेक्षेइतके यशदायी ठरलेले नसले तरी निवृत्तीचा लवलेशही त्याच्याकडे नाही. अमेरिकेतील स्पर्धेद्वारे माजी विश्वविजेता गॅरी कास्पारोव्ह पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदार्पण करीत आहे. त्यामुळेच या स्पर्धेत सर्वोत्तम यश मिळवण्यासाठी आनंद हा कसून सराव करीत आहे. सराव करताना त्याने बराचसा वेळ आपल्या कुटुंबीयांसाठी दिला होता. त्याने रॉजर फेडररच्या आठव्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचाही ‘आनंद’ लुटला.

आनंद म्हणाला, ‘‘फेडररने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवताना ३७व्या वर्षीही आपण अव्वल दर्जाचा खेळ करू शकतो, हे दाखवून दिले आहे. माझ्यासाठी हे प्रेरणादायक यश आहे. त्याने क्ले कोर्टवरील फ्रेंच स्पर्धेत भाग घेतला नाही व त्याऐवजी त्याने विम्बल्डनमधील विक्रमी विजेतेपदासाठी लक्ष केंद्रित केले होते. विम्बल्डनमधील त्याचा खेळ खरोखरीच महान टेनिसपटूच्या दर्जाचा होता. मलादेखील फेडरर याच्याप्रमाणेच चमकदार कामगिरी करावयाची आहे. काही दिवस विश्रांती घेतली की आपोआप स्पर्धासाठी योग्य ती ऊर्जा मिळत असते.’’

‘‘प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीमध्ये यशापयशाचे टप्पे येतच असतात. काही वेळा अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागते, तर काही वेळा आश्चर्यजनक विजयही मिळविता येतो. विश्वविजेतेपद मिळवण्याची क्षमता माझ्याकडे आहे. मला सतत निवृत्तीविषयी विचारले जात असते. अशा प्रश्नांची सवय झाली आहे. मी त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. कास्पारोव्हसारखा ज्येष्ठ खेळाडू पुन्हा स्पर्धात्मक कारकीर्द सुरू करीत आहे. मी त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी लहान आहे. तो जर अजून खेळू शकतो तर मीदेखील अव्वल कामगिरी करू शकेन,’’ असे आनंदने सांगितले.

विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनविषयी तो म्हणाला, ‘‘यंदाच्या मोसमात काही स्पर्धामध्ये त्याला विजेतेपद मिळविता आले नव्हते. तोदेखील पराभूत होऊ शकतो हे या मोसमात पाहायला मिळाले. लिव्हॉन आरोनियन व वेस्ली सो यांनी  अनेक स्पर्धामध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.’’