दळणवळणाची साधनं, पोस्ट, शिक्षणव्यवस्था यांचा पाया देशभरात उभारण्याचं श्रेय ब्रिटिशांना जातं. तब्बल दीडशे वर्षांच्या याच वसाहती प्रशानसात ब्रिटिशांच्या माध्यमातून खेळांची भारतीयांना ओळख झाली. तत्कालीन राज्यकर्त्यांकडून मिळालेला हा खेळांचा वारसा आज असंख्य भारतीय क्रीडापटू निगुतीने जपत आहेत. खेळ म्हटलं की त्याच्याशी निगडित साहित्य ओघाने आलेच. ब्रिटिशांच्या काळापासून अगदी आताच्या तंत्रज्ञानयुक्त अद्ययावत क्रीडा साहित्य विक्रीची एक परंपरा वागळे कुटुंबीयांनी जोपासली आहे. १८६५ मधल्या निवांत मुंबईत सुरू झालेल्या छोटय़ा व्यवसायाला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशराज, फाळणी, स्वातंत्र्योत्तर कालखंड, भारतीय क्रीडाक्षेत्रात झालेले बदल, आर्थिक स्थित्यंतरं अशा इतिहासातल्या असंख्य क्षणांचा वागळे स्पोर्ट्स साक्षीदार आहे. मराठी माणूस धंदा करू शकत नाही या समजाला छेद देत वागळेंची पाचवी पिढी व्यवसायाचा डोलारा सांभाळते आहे.
वागळे कुटुंबीय मूळचे गोव्याचे. साधारण तीनशे वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई गाठली. रघुनाथ वागळे यांचा अत्तराचा व्यवसाय होता. राहण्याचं ठिकाण गिरगाव. याच गिरगावपासून जवळ असलेल्या मरिन लाइन्स परिसरात ब्रिटिश सैनिक, अधिकारी राहत असत. रघुनाथरावांची अनेकांशी ओळख आणि नंतर मैत्रीच झाली. मोकळ्या वेळेत ब्रिटिश सैनिक खेळत असत. परंतु खेळायची साधनं मायभूमीतून आयात करावी लागत असत. यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागत असे. यामुळे तुम्ही क्रीडा साहित्याचा व्यवसाय करावा असा सल्ला ब्रिटिशांनीच रघुनाथरावांना दिला. भारतात क्रीडा साहित्याची निर्मित्ती करणारे कारखाने नसल्याने रघुनाथरावांनाही सव्यापसव्य करावा लागत असे. मात्र त्यांनी ते कष्ट घेतले. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात तग धरणं फारच कठीण होतं. परंतु ब्रिटिशच प्रामुख्याने ग्राहक असल्याने व्यवसाय टिकून राहिला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशातच क्रीडा साहित्याची निर्मित्ती करणारे कारखाने उभे राहिले. यामुळे आयातीचा खर्च, वाहतुकीतला वेळ वाचू लागला. काश्मीर, मेरठमधील कारखान्यांना भेटी देऊन, माणसं जोडण्याची जबाबदारी वाढली. क्रिकेट आणि हॉकीने जोम धरला होता. याच कालखंडात रघुनाथरावांचा वारसा दीनानाथ यांच्याकडे आणि नंतर रामचंद्र यांच्याकडे आला. क्रीडा संस्कृतीचा मागमूस नसलेल्या देशात क्रीडा साहित्याचा व्यवसाय करणं धाडसाचंच. परंतु शिक्षण पूर्ण केल्यानंतरही वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्याची निष्ठा या दोघांनी दाखवली. नुकतंच स्वातंत्र्य मिळालेला देश, प्रत्येक क्षेत्रात मूलभूत सुविधांसाठीच संघर्ष सुरू असलेला, अशा कठीण कालखंडातही वागळे कुटुंबीयांनी धीर सोडला नाही. प्रत्येक खेळ, त्यातले बारकावे समजून घेऊन खेळाडूंना सोयीचं काय ठरेल अशा साहित्य विक्रीवर त्यांनी भर दिला. खेळांचं माहेरघर असणारे जिमखाने, क्लब, मैदानं यांच्यापासून जवळच असलेलं वागळे स्पोर्ट्स देशभरातल्या क्रीडा साहित्य विक्रीच्या अग्रगण्य आस्थापनांपैकी एक झालं. आज मनोहर वागळे आणि त्यांची मुलं व्यवसाय सांभाळत आहेत.
कालौघात खेळ बदलले, नियम बदलले, क्रीडा साहित्यामध्येही नावीन्य आलं. परंतु आजही अनेक दुर्मीळ क्रीडा साहित्याचा खजिना वागळेंकडे आहे. व्यवसाय, नफा सगळं आहेच, परंतु ग्राहकाच्या गळ्यात वस्तू उतरवण्यापेक्षा त्या खेळाडूची नक्की आवश्यकता काय याचा आम्ही अभ्यास करतो. अनेकदा पालकांनी किंवा प्रशिक्षकांना सूचनाही करतो. यामुळे आम्हाला थोडं नुकसान सोसावं लागतं पण अचूक मार्गदर्शन केल्याचं समाधान महत्त्वाचं आहे असे मनोहर सांगतात. मुंबई परिसरातल्या असंख्य युवा क्रीडापटूंच्या कारकीर्दीची सुरुवात वागळे स्पोर्ट्समधील खरेदीनेच झाली आहे.
ग्लोबलायझेशन पर्वानंतर व्यवसायाच्या समीकरणांमध्ये बदल झाला. ब्रँडेड साहित्याची मागणी वाढली. मात्र केवळ ब्रँड म्हणून वस्तू खरेदी करण्यापेक्षा, त्याच्या निम्म्या किमतीत दर्जेदार आणि तरीही परवडणाऱ्या दरात भारतीय कंपन्यांतर्फे उत्पादित साहित्य उपलब्ध असते. आम्ही ग्राहकांसमोर दोन्ही वस्तू ठेवतो आणि निर्णय त्यांच्यावर सोपवतो असे मनोहर यांनी सांगितले. यामुळेच फक्त मुंबई नव्हे उपनगरं, अमरावती, अकोला अशा राज्यभरातून आणि अन्य राज्यांतूनही ग्राहकवर्ग येत असतो. खेळांची लोकप्रियता वाढू लागली तशी मुंबईच्या उपनगरांमध्ये क्रीडा साहित्यांची विक्री केंद्रं तयार झाली. वेळ आणि पैसा खर्च करून मुंबईला येण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाइन खरेदीला पसंती मिळू लागली आहे. काळबादेवी परिसरात पंचवीस ते तीस दुकानांच्या बरोबरीने आता ऑनलाइन मार्केट आव्हान देत आहे.
क्रीडा साहित्य अत्यावश्यक गोष्टींमध्ये येत नाही, त्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात तग धरणं परीक्षा पाहणारं असतं. परंतु दर्जेदार वस्तू मिळेल, हा पिढय़ान्पिढय़ांचा विश्वास असल्याने कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, असे मनोहर सांगतात. गौरवशाली दीडशे वर्षांच्या निमित्ताने खेळासाठी परिसंवाद, प्रदर्शन, संग्रहालय, दृकश्राव्य मांडणी आणि अपंग खेळाडूंसाठी सामने आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे वागळे यांनी सांगितले.
विविध भाषिक आणि विविध स्तरातल्या ग्राहकांना जोडण्यासाठी संभाषण कौशल्य उत्तम लागते हे मनोहर यांनी विशेषत्वाने नमूद केले. मराठी माणूसही व्यवसाय करू शकतो हे सिद्ध करत वागळे स्पोर्ट्स दीडशेव्या वर्षीही दिमाखात उभे आहे.
parag.phatak@expressindia.com