नेमबाजीच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदी हंगेरीचे लॅझलो शुसाक यांची नियुक्ती करण्यासाठी भारतीय नेमबाजी संघटना प्रयत्नशील आहे. मात्र शुसाक यांनी प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी काही अटी मांडल्या आहेत. या अटींची माहिती नेमबाजी संघटनेने भारतीय क्रीडा प्राधिकरणा(साइ)ला दिली आहे. ‘साइ’कडून मान्यतेच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत, असे नेमबाजी संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले.
लॅझलो शुसाक यांच्या अटींना होकार दिल्यास त्यांची प्रशिक्षकपदाचा तिसरा कार्यकाळ असणार आहे. याआधी त्यांनी १९९८-२००० आणि २००४-२००९ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्राला त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात शुसाक यांनी प्रशिक्षण दिले होते. मात्र शुसाक यांची नियुक्ती झाली तरी ते कनिष्ठ खेळाडूंनाच प्रशिक्षण देतील, असे नेमबाजी संघटनेने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी स्टॅनिस्लाव्ह लॅपिडस हे कार्यरत आहेत. २००९ नंतर शुसाक यांनी इराण संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले.