आशियाई क्रीडा स्पध्रेतील हॉकीचे सुवर्णपदक जिंकून आता भारताच्या पुरुष संघाला १६ वष्रे लोटली आहेत. परंतु दक्षिण कोरियामधील इन्चॉन येथे होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेत सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुवर्णपदकाची ही प्रतीक्षा संपणार आहे, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी व्यक्त केला आहे.
भारताने १९६६ आणि १९९८मध्ये आशियाई क्रीडा स्पध्रेत हॉकीचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २००२मध्ये बुसानला झालेल्या स्पध्रेत भारताने रौप्यपदकापर्यंत मजल मारली होती. परंतु वॉल्श मात्र यंदा भारताच्या कामगिरीबाबत आशावादी
आहेत.
‘‘स्पध्रेत सहभागी झालेल्या संघाचे क्रमवारीतील स्थान कोणते याला महत्त्व नसते. त्यांची वास्तववादी कामगिरी महत्त्वाची असते. त्यामुळेच संभाव्य पदक विजेता संघ म्हणूनच भारत या स्पध्रेत सहभागी होत आहे,’’ असे वॉल्श यावेळी म्हणाले. भारताचा ब-गटात समावेश आहे. याशिवाय गतविजेता पाकिस्तान, चीन, ओमान आणि श्रीलंका यांचा या गटात समावेश आहे.