ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी महिला कुस्तीत पहिलं पदक जिंकून देणारी साक्षी मलिकने डोळ्यासमोर नवं उद्दीष्ट ठेवलं आहे. देशासाठी महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिकची दोन पदकं जिंकण्याचा पराक्रम करण्याची इच्छा असल्याचं साक्षी मलिकने म्हटलं आहे.

”कुस्ती खेळ हा माझ्यासाठी पुजेसमान आहे. आज जे काही मी आहे ते या खेळामुळे आहे. या खेळाने मला यशासाठी कोणतेही शॉर्टकर्ट नसतात हे शिकवलं. दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी देशाची पहिली महिला कुस्तीपटू मला व्हायचं आहे.”, असे साक्षी मलिक म्हणाली.
२४ वर्षीय साक्षी मलिक सध्या ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेची तयारी करत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पॅरिसमध्ये होत आहे. लग्नानंतरही आपल्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नसल्याचंही साक्षी म्हणाली.

 

”पूर्वीसारखाच माझा आजही कसून सराव सुरू आहे. स्वत:मध्ये वेळोवेळी बदल करण्याची इच्छा आहे. आपण शिकणं कधीच थांबवत नसतो म्हणून प्रयत्न सुरूच राहतील. वैवाहिक कुस्तीपटू अनेक आहेत. त्यांना मुलंही आहेत आणि आजही ते पदक जिंकत आहेत.”, असे साक्षी म्हणाली.

साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये ५८ किलो वजनी गटात महिला कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली होती. साक्षीच्या या पदकानंतर हरियाणातील लोकांच्या विचारसरणीत कमालीचा बदल झाला. याबाबतही साक्षीने आपलं मत व्यक्त केलं.

”ऑलिम्पिक पदकानंतर नक्कीच बदल जाणवला. मी ज्या वातावरणात कुस्ती खेळायला सुरूवात केली आणि पदक जिंकल्यानंतर आज ज्यापद्धतीने सराव करतेय. लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलला आहे. हरियाणात आता पालक त्यांच्या मुलींना कुस्ती खेळण्यासाठी अडवणूक करत नाहीत. अनेक पालकांनी तर आम्हालाही आमच्या मुलीला तुझ्यासारखं कुस्तीपटू करायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केलीय.”, असं साक्षीने सांगितलं.

याशिवाय, काही मुलींनीही आपल्याशी संपर्क साधून कुस्ती खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. पण पालकांची परवानगी नसल्याने त्यांची समजूत काढण्याची विनंती केली. साक्षीने त्या मुलींच्या घरी जाऊन पालकांची समजूत काढल्याचंही सांगितलं. कुस्ती खेळात एखादा मुलगा ज्याप्रमाणे आपलं नाव कमावू शकतो तसंच मुलगीही स्वत:ची ओळख निर्माण करू शकते, असं साक्षी त्या मुलींच्या पालकांना म्हणाली.