बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त डेव्हिड वॉर्नर आणि सरावादरम्यान हेल्मेटवर प्रहार झाल्याने मानसिक आघात झालेला शेन वॉटसन हे दोघेही तिसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. या दोघांनीही बुधवारी संघाच्या सरावात भाग घेतला.
‘‘सरावाच्या सुरुवातीला मला थोडय़ा वेदना जाणवत होत्या. पण ते साहजिक आहे. फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याचा मी प्रयत्न केला. दुखापतीसह मी किती जोरात फटके मारू शकतो याचा अंदाज घेतला. दुखापत असली तरी मी खेळू शकेन,’’ असे वॉर्नरने सांगितले.
जेम्स पॅटिन्सनचा वेगवान चेंडू हेल्मेटवर आदळल्याने मानसिक आघात झालेला वॉटसन बुधवारी पुन्हा मैदानात उतरला. मात्र त्याने कोणत्याही वेगवान गोलंदाजाचा सामना केला नाही.
दरम्यान, दुखापतग्रस्त मिचेल मार्शच्या जागी जो बर्न्‍सचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, डाव्या हाताला दुखापत झालेला मिचेल स्टार्कनेही सरावात भाग घेतला. मात्र दुखापतग्रस्त कर्णधार मायकेल क्लार्कच्या ऐवजी संघात आलेल्या शॉन मार्शला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली आहे.
वेगवान गोलंदाज रायन हॅरिस दुखापतीतून सावरला आहे, मात्र त्याचा अंतिम अकरात समावेश करण्यात येणार का, याविषयी निर्णय घेण्यात आलेला नाही.
क्लार्क समालोचक
मेलबर्न : मांडीचे स्नायू आणि पाठीच्या दुखण्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क तिसऱ्या कसोटीदरम्यान समालोचकाच्या भूमिकेत असणार आहे. क्लार्क चॅनेल नाइनसाठी समालोचन करणार आहे. समालोचनाचा अनुभव नवीन असणार आहे. या नव्या भूमिकेसाठी उत्सुक आहे असे क्लार्कने म्हटले आहे.