ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स संघाच्या बेन लॉगलिनने अप्रतिम झेल घेतला आहे. बेनने घेतलेला जबरदस्त झेल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बेन लॉगलिनने अतिशय सुंदर झेल घेत अॅडलेड स्ट्रायकर्सचा सलामीवीर ऍरॉन फिंचला माघारी धाडले. अॅडलेडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी सुरू केल्यावर फिंचकडून घणाघाती फलंदाजी सुरू केली होती. मात्र नेसरच्या गोलंदाजीवर सीमारेषेच्या दिशेने धावत उंच गेलेला चेंडू बेन लॉगलिनने अप्रतिमरित्या झेलला.

अॅडलेड स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकल्यावर सलामीवर ऍरॉन फिंच आणि मार्क्स हॅरिस यांनी तुफान फलंदाजी सुरू केली. १० च्या धावगतीने फटकेबाजी करत या दोघांनी अवघ्या ५.३ षटकांमध्ये ५५ धावा कुटल्या. फिंचने चार चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले होते. दुसऱ्या बाजूला हॅरिसनेदेखील रेनेगेड्सच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली होती. पहिल्या पाच षटकांमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजी फोडून काढल्यानंतर मायकेल नेसरच्या सहाव्या षटकातही फिंच आणि हॅरिसचा आक्रमक पवित्रा कायम होता. सहाव्या षटकाचा चौथा चेंडू ऍरॉन फिंचने उंच टोलवला.

ऍरॉन फिंचने षटकार मारण्याचा प्रयत्न केला असला तरी तो व्यवस्थित बॅटवर आला नव्हता. मात्र तरीही हा चेंडू ३० यार्डच्या आत क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंच्या डोक्यावर गेला होता. मात्र आकाशात उंच गेलेला चेंडू झेलण्यासाठी बेन लॉगलिन सीमारेषेच्या दिशेने धावू लागला. चेंडूने गाठलेली उंची आणि त्याचा वेग लक्षात घेत लॉगलिन वेगाने धावत होता. वेगाने धावत असताना लॉगलिनची चेंडूवर असणारी नजर कायम होती. अखेर चेंडू जवळ येताच तो थोडा पुढे पडणार, याची जाणीव लॉगलिनला झाली. त्यामुळे मग समोर झेपावत लॉगलिनला अप्रतिम झेल घेतला. लॉगलिनच्या या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे वेगाने फलंदाजी करणाऱ्या अॅडलेडच्या संघाला पहिला धक्का बसला.