क्रिकेट सामन्यावर समालोचन करणे तसे जिकरीचे काम. संपूर्ण सामन्यात तुम्हाला सतत आपले मत व्यक्त करत राहावे लागते. यासोबतच सामन्याच्या परिस्थितीची इत्यंभूत माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे यात समालोचकाचा कस लागतो. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी समालोचक आपल्या अनुभवाच्या जोरावर काही लक्षवेधी विधाने देखील करतात. पण अशाच एका विधानाचा फटका न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस यां बसला. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मोहाली येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात समालोचन कक्षात स्कॉट स्टायरिस, रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर सामन्याचे समालोकन करत होते. भारतीय संघाचा कामचलावू गोलंदाज केदार जाधव याने गेल्या तीन सामन्यांत चांगल्या विकेट्स मिळविल्याने स्कॉट स्टायरिस नाराज होता. त्यामुळे मोहाली येथील सामन्यात जेव्हा केदार जाधव गोलंदाजीला आला त्यावेळी स्टायरिस म्हणाला की, जर केदार जाधवने आज विकेट घेतली तर मी समालोचन कक्षातून निघून जाईन आणि मिळेल त्या पहिल्या विमानाने मायदेशी रवाना होईन.

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे कधी कोणता बदल होईल आणि सामन्याला कशी कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही. केदार जाधवने आपल्या दुसऱया षटकाच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला पायचीत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले.

केदार जाधवने विकेट घेतल्यानंतर स्टायरिस यालाही आपला शब्द पाळावा लागला. स्टायरिस हातातील माईक खाली ठेवून समालोचन कक्षातून निघून गेला. एका नेटिझनने स्टायरिस आता कुठे आहे? असा सवाल उपस्थित केल्यानंतर खुद्द स्टायरिस यांनी मिश्किलपणे, मी आता दडून बसलोय, अशी प्रतिक्रिया दिली. केदार जाधवने मोहालीतील सामन्यात २९ धावांत तीन विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघाने सामना सात विकेट्सने जिंकला.