अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का, सिमोन हालेपची विजयी सलामी; केई निशिकोरीची आगेकूच

गतविजेत्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सलामीच्या लढतीतच विजयासाठी संघर्ष करावा लागला. जपानच्या केई निशिकोरीने विजयासह दुसरी फेरी गाठली. महिलांमध्ये अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का, सिमोन हालेप यांनी दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.

जेतेपद कायम राखण्यासाठी वॉवरिन्का आतूर आहे. मात्र गेल्यावर्षी विम्बल्डन स्पर्धेत राफेल नदालला चीतपट करणाऱ्या ल्युकास रोसोलने वॉवरिन्काला टक्कर दिली. पाचव्या सेटपर्यंत गेलेल्या सामन्यात वॉवरिन्काने ४-६, ६-१, ३-६, ६-३, ६-४ अशी बाजी मारली. रोसोलच्या झंझावाती खेळापुढे वॉवरिन्कापुढे सलामीच्या लढतीतच गारद होण्याची वेळ येणार अशी चिन्हे होती. मात्र चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये लौकिकाला साजेसा खेळ करत वॉवरिन्काने सरशी साधली.

पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम विजयासाठी उत्सुक पाचव्या मानांकित केई निशिकोरीने सिमोन बोलेलीवर ६-१, ७-५, ६-३ अशी मात केली. कारकीर्दीतला निशिकोरीचा हा पन्नासावा विजय आहे. पुढील फेरीत निशिकोरीची लढत आंद्रेय कुझनेत्सोव्हशी होणार आहे.

कॅनडाच्या मिलास राओनिकने जॅन्को टिप्सारेव्हिचवर ६-३, ६-२, ७-६ असा विजय मिळवला. व्हिक्टर ट्रॉइकीने ग्रिगोर दिमित्रोव्हचा २-६, ६-३, ५-७, ७-५, ६-३ असा पराभव केला.

महिलांमध्ये द्वितीय मानांकित रडवानस्काने बोजाना जोव्होनाव्हसीचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. सहाव्या मानांकित सिमोन हालेपने नाओ हिबिनोचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. चौथ्या मानांकित गार्बिन म्युग्युरुझाला विजयासाठी तिसऱ्या सेटपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. तिने अना श्मिलडोव्हाचा ३-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. स्वेतलाना कुझनेत्सोव्हाने यारोस्लोव्हा श्वेडोव्हाला ४-६, ६-१, ६-४ असे नमवले. केटरन्या बोंडरइन्को सातव्या मानांकित रॉबर्टा व्हिन्सीला ६-१, ६-३ असे नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली. स्वेताना पिरोंकोव्हाने सारा इराणीचा ६-३, ६-२ असा पराभव केला.

दरम्यान पावसामुळे सोमवारच्या खेळापैकी दीड तासाचा खेळ वाया गेला. रविवारी पावसाचा जोर वाढल्याने केवळ चार तासाचा खेळ होऊ शकला. दरम्यान पावसाच्या आगमनासह हवामान १२ पर्यंत खाली आहे.