भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने कटक वनडेतील संघाच्या विजयाचे श्रेय युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांना दिले. युवी आणि धोनीच्या शतकी खेळीमुळे आम्हाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. धोनी आणि युवीच्या संघातील कामगिरीबाबत संघ व्यवस्थापनाने जी दूरदृष्टी ठेवली ती यशस्वी ठरली. असे सांगत कोहलीने जणू धोनी-युवीच्या खेळीची पूर्वकल्पनाच असल्याचे व्यक्त केले.

कटक वनडेमध्ये भारतीय संघाची ३ बाद २९ अशी धावसंख्या असताना युवराज आणि धोनीने चौथ्या विकेटसाठी तब्बल २५६ धावांची भागीदारी रचली. युवराजने आपली सर्वोत्तम १५० धावांची खेळी साकारली, तर धोनीने १३४ धावा केल्या. दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडसमोर ३८१ धावांचा डोंगर उभारता आला होता. सामना झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला की, आम्ही चांगली सुरूवात करू शकलो असतो तर अखेरच्या षटकावेळी परिस्थिती वेगळीच पाहायला मिळाली असती. आमची सुरूवात चांगली झाली नाही. युवी-धोनीने संघाला सावरले. खरंतर संघात हे दोघं अनुभवी क्रिकेटपटू असणे म्हणजे संघासाठी खूप फायदेशीर ठरेल असा विश्वास संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला होता. दोघांनी आपल्या दमदार खेळीने संघ व्यवस्थापनाने व्यक्त केलेली दूरदृष्टी यशस्वी ठरवून दाखवली.
संघाच्या केवळ २५ धावा आणि तीन विकेट्स पडल्या असताना अखेरीस ३८१ धावांपर्यंत पोहोचणे म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आम्हाला सामन्यात एका ठिकाणी विकेट्स देखील मिळत नव्हत्या, पण दबावाच्या परिस्थितीत गोलंदाजी करणे कठीण गोष्ट आहे. खरंच संघातील सर्वांनीच खूप चांगली कामगिरी केली, असेही कोहली म्हणाला.

वाचा: क्रिकेट सोडण्याचा विचार होता, पण… – युवराज सिंग

इंग्लंडविरुद्धचा मालिका विजय आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार असल्याचेही कोहली म्हणाला. सध्या आम्हाला सलामीजोडीवर काम करावे लागणार आहे. संघाची सुरूवात कशी सुधारता येईल यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे कोहलीने सांगितले. संघाचा पुढील प्रवास कसा असेल ते माहित नाही, पण आम्ही नेहमी जिंकण्याच्या उद्देशानेच खेळू सध्या आम्ही आमच्यातील केवळ ७५ टक्के कौशल्याचा उपयोग केल्याचे सांगता येईल, आणखी चांगली कामगिरी नक्कीच करता येऊ शकते, असेही तो म्हणाला.