एकीकडे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडून विराट कोहलीकडे आले आहे, तर दुसरीकडे भारतीय संघासाठी प्रशिक्षकाची निवड सुरू आहे. विराट कोहली आक्रमक असून त्याच्या स्वभावातील आक्रमकतेवर नियंत्रण ठेवणारा भारताचा नवीन प्रशिक्षक असायला हवा, असे मत भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी म्हटले आहे.
‘‘माझ्या मते विराटला चांगल्या प्रशिक्षकाची गरज आहे, जो त्याला चांगले मार्गदर्शन करू शकेल. जो कुणी भारतीय संघाचा प्रशिक्षक होईल, त्याला कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवता यायला हवे. कोहली हे आवेगशील व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यामध्ये त्याने बदल करण्याची गरज आहे. क्रिकेट हा काही कबड्डी किंवा खो-खोसारखा खेळ नाही. कारकीर्द जर दीर्घ व्हावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या आक्रमक स्वभावामध्ये बदल करायलाच हवा,’’ असे बेदी म्हणाले.
प्रसारमाध्यमांनी कोहलीची केलेली प्रशंसा आणि त्याच्या आक्रमक स्वभावाचे केलेले वर्णन बेदी यांना खटकते. याबाबत ते म्हणाले की, ‘‘प्रसारमाध्यमांनी कोहलीची छबी बनवली आहे आणि तेच त्याला संपवतील. यासाठी कोहलीने काळजी घेणे गरजेचे आहे. कोहलीच्या प्रत्येक लहान गोष्टींवरही नजर ठेवली जात आहे, त्यामुळे कोहलीने अधिक काळजी घ्यायला हवी.’’